बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विर्सजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 11:58 AM2021-11-17T11:58:58+5:302021-11-17T12:09:10+5:30
नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब पुरंदरे अमर रहे’ अशा घोषणा देत, शिवचरित्र ...
नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब पुरंदरे अमर रहे’ अशा घोषणा देत, शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रामकुंडात मंगळवारी (दि. १६) सकाळी विसर्जित करण्यात आल्या. नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्राचे मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते अस्थींचे पूजन करण्यात आले. दरम्यान, आळंदी तीर्थक्षेत्र इंद्रायणीत देखील अस्थी विसर्जित करण्यात आल्या असून उर्वरित अस्थींचे राज्यभरातील गडकिल्ल्यांच्या मातीत विसर्जन करण्यात येणार आहे.
इतिहासलेखक पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी (दि. १५) पहाटे पुण्यात निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरंदरे यांच्या निधनावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभ्यासू शिवचरित्रकार हरपल्याची भावना व्यक्त केली.
त्यानंतर मंगळवारी सकाळी अकरा वाजता बाबासाहेबांच्या अस्थींचे रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. बाबासाहेबांचे पुतणे मंगेश पुरंदरे हे अस्थिकलश घेऊन सकाळी पुण्याहून रामकुंड परिसरात दाखल झाले. येथे बाबासाहेबांचे मानसपुत्र मकरंद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अस्थींचे पूजन करण्यात आले.
पूजनानंतर अस्थीविसर्जनस्थळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे’, ‘परत या, परत या, बाबासाहेब परत या’ अशा घोषणा देत अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. या वेळी भाजप शहर उपाध्यक्ष अनिल भालेराव, नंदन रहाणे, योगेश बक्षी, राहुल सराफ, चंद्रकांत चौधरी, नितीन नाईक, महेश उपासणी, जयप्रकाश जातेगावकर आदींसह बाबासाहेब पुरंदरे यांचे चाहते उपस्थित होते. पौराेहित्य सचिन हिंगणे यांनी केले.
------- इन्फो
बाबासाहेब पुरंदरे यांनी जीवनभर शिवचरित्र, राज्यभरातील गड-किल्ल्यांचा अभ्यास केला. त्यामुळे राज्यभरातील गडकिल्ल्यांच्या मातीत बाबासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन करण्याचा निर्णय पुरंदरे कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, आळंदी येथे इंद्रायणी आणि नाशिकला रामकुंडात देखील अस्थींचे विसर्जन करण्यात आले.