लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल
By धनंजय रिसोडकर | Published: September 9, 2022 02:35 PM2022-09-09T14:35:28+5:302022-09-09T14:37:56+5:30
गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
नाशिक - ढोल ताशांच्या गजरात झालेल्या मानाच्या गणपतींच्या आरतीनंतर झालेला 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरानंतर मानाच्या मुख्य गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी 11.30 वाजता सुरुवात झाली. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
जुन्या नाशिकमधील वाकडी बारव इथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त पुलकुंडवार, माजी महापौर वसंत गीते, विनायक पांडे लक्ष्मण सावजी, सतीश शुक्ल,समीर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे.दोन वर्ष कोरोनाच्या कहरामुळे निघू न शकलेल्या मिरवणुकांमुळे यंदा कार्यकर्त्यांसह ढोल वादकांचा जल्लोष अधिकच उफाळून आलेला होता. गुलालवाडी पथकाच्या शेकडो लेझीमपटूंसह प्रत्येक मोठ्या मंडळाच्या ढोल पथकाने वातावरणात जल्लोष भरला होता.
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणपती बाप्पाला नाशिककरांनी निरोप देण्यासाठीची ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. मिरवणुकीत पोलिसांकडून देखील चूक बंदोबस्त ठेवण्यात आला असून जागोजागी विविध मंडळांच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपातून लाऊड स्पीकर द्वारे गणेश मंडळे आणि गणेश भक्तांचे स्वागत केले जात आहे.