खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:26 PM2019-04-27T16:26:49+5:302019-04-27T17:06:30+5:30
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
मालेगाव - खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या सावटाने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाच्या किमती स्थिर आहे, मात्र शेतीला लागणारा निविष्ठांचा किमती झपाट्याने वाढल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्याकरिता रासायनिक खतांवर सबसिडी दिली जाते. ही सबसिडी कोट्यवधीच्या घरात असली तरी दरवर्षी खतांचा किमती वाढतच असल्याने खर्चात वाढ होऊन नफा घटत आहे.
खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधीची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पाँस मशीनच्या प्रयोग राबविला गेला. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सबसिडी चोरीला आळा बसला, पण दुसरीकडे खतांचे भाव वाढविण्यात आले, असे शेतकरी सांगतात. शेतमालाचे दर जैसेथे तैसच आहे. इतकेच नव्हे तर काही धान्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. मात्र बियाणे, खत, मजुरी आणि विजेचा दरात वाढ होतच आहे. यामुळे शेतकऱ्याची कोंडी आणि व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांचा किमतीत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतीत होणारे नुकसान भरून काढता काढता नाकीनऊ आलेल्या शेतकरावर यंदाही अर्थिक भुर्दंड पडणार आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. एकरी एक ते दोन रासायनिक खतांच्या बँग शेतकरी वापरतात. साधारणत: एका बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.
अशा वधारल्या खताच्या किंमती
खरीप हंगामापुर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०.२६.२६ या खंताची ५० किलोची बॅग १२३५ रूपायांपर्यत मिळायाची, ती आता १३४० रुपये किमतीत घ्यावी लागणार आहे. जवळपास १०५ रुपये अतिरिक्त शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत. डिएपीची बँग १२९० रुपयाऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रुपयाने भाव वाढले आहेत. तर पोटॅशची बॅग ७०० रुपयावरुन थेट ९०० रुपये किमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे.