आंबा उत्पादनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:13 PM2020-01-30T23:13:31+5:302020-01-31T00:47:00+5:30
परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.
खेडलेझुंगे : परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.
वातावरणातील नियमितच्या बदलांमुळे सर्व शेतपिकांवर परिणाम झाला आहे. त्याप्रमाणे फळबागांवरही त्याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी आॅक्टोबरपासून आंबा मोहरू लागतो. खरा मोहर येतो तो नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान. सर्वसाधारण यादरम्यानच मोहरात कणी तयार होते. कणी म्हणजे फुलातून बाहेर आलेले अतिसूक्ष्म आंब्याचे फळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा त्याआधीही बाजारात येतो. मात्र खरा हंगाम हा मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. परंतु यावर्षी उशिरा
झालेल्या पावसामुळे सर्व शेतीचे गणिते उलटली आहे. कांदा असो वा आंबा सर्वच पिकांना उशीर झालेला आहे. यावर्षी जानेवारी पूर्णत: संपलेला असून, खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, धरणगाव, सारोळे थडी परिसरातील एकाही आंब्याला मोहर आलेला नाही. लोणच्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गावठी
कैऱ्या बाजारात मिळत होत्या. परंतु यावर्षी येथील रहिवाशांनाच लोणच्यासाठी कैºया विकत घेण्याची वेळ आली आहे.
पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने हंगाम लांबणार
जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम आहे; मात्र यावेळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस झाल्याने जमिनीतील ओल कायम राहिल्यामुळे शेतपिकांसह आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओल कायम राहिल्याने जानेवारीअखेरपर्यंत आंब्याला मोहर आलेला नाही. आंब्याला मोहर येण्यासाठी ठरावीक तापमानाची गरज असते. सतत बदलणाºया हवामानामुळे हा कालावधी लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.
साधारणपणे सप्टेंबरअखेर पावसाचे प्रमाण कमी होते.
मात्र यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. पावसाचे वेळापत्रक दोन महिने पुढे सरकत असल्याने आंबा मोहराचा हंगामही पुढे सरकल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. इतक्या उशिराने येणारा आंबा, बाजारात दाखल होण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळणार नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
आंबा या फळपिकास समप्रमाणात थंडीची आवश्यकता असते. यंदा तापमान हे कमी-अधिक झाल्यामुळे आंब्यास मोहर येण्यावर परिणाम झाला. यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रताप मोगरे, कृषी पर्यवेक्षक