‘निसर्ग’चा प्रभाव : शहरात २४ तासांत १४४ मि.मी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:43 PM2020-06-04T16:43:39+5:302020-06-04T16:44:20+5:30
हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांनी दिली.
नाशिक : शहरात बुधवारी (दि.३) सकाळी साडे आठ वाजेपासून गुरूवारी (दि,४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत एकूण १४४.२ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वाधिक ६६.४ मिमी इतका पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राकडून देण्यात आली.
मुंबईकडून उत्तर महाराष्टÑाकडे निघालेल्या ‘निसर्ग’ वादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरुपात जाणवला.
मुंबई किनारपट्टीहून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा परिणाम शहरावर बुधवारी संध्याकाळी अधिक तीव्रतेने झालेला पहावयास मिळाला. मंगळवारी जरी ढगाळ हवामानासह पावसाची शिडकावा झाला असला तरी केवळ ६.२ इतका पाऊस दिवसभरात झाला होता; मात्र बुधवारी सकाळपासून संध्याकाळी साडे ५ वाजेपर्यंत १७ मिमी पर्यंत पाऊस नोंदविला गेला. बुधवारी दुपारनंतर सरींची रिपरिप मुसळधार पावसात बदलली. त्यावेळी शहरात ताशी ३० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. वादळी वाऱ्यामुळे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरात डझनभर वृक्ष कोसळली होती. संध्याकाळनंतर मुसळधार वादळी पावसाने शहराला झोडपून काढले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जोर‘धार’ वादळी पाऊस शहरात सर्वत्र सुरू होता. रात्री साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत ५२.३ तर साडेदहा ते साडे अकरा वाजेपर्यंत केवळ तासाभरात शहरात ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या तीन तासांत ११८ मिमी इतका पाऊस शहरात झाल्याने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. दुतोंडया मारु तीची मूर्ती गुडघ्यापर्यंत बुडाली होती. शहरातील भुयारी पावसाळी गटारी तुडूंब भरून वाहत होत्या. ठिकठिकाणी गटारींवरील ढापे पाण्याच्या जोराने अक्षरक्ष: तरंगताना दिसून आले. गटारींमधून वाहणारे पावसाचे पाणी थेट गोदापात्रात आल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती.
इन्फो--
शहरात २४ तासांत उच्चांकी पाऊस
असे तीव्र वादळ हे फारच क्वचित येते. ‘अम्फान’ वादळाच्या तुलनेत काहीसे कमी मात्र शक्तीशाली असलेले ‘निसर्ग’ वादळामुळे वा-याचा वेगाने पावसाचे ढग मुंबई सोडून आजुबाजुच्या जिल्ह्यांत सरकले आणि मुसळधार पाऊस झाला. हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांनी दिली. पावसाळ्याच्या हंगामातसुध्दा २४ तासांत इतका मुसळधार पाऊस अद्याप शहरात झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.