ओखी वादळाचा प्रभाव, नाशिकमध्ये पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:29 AM2017-12-05T10:29:52+5:302017-12-05T10:31:06+5:30
जनजीवन विस्कळीत : चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय
नाशिक - ओखी वादळाचा परिणाम नाशिक शहरावरही दिसून येत असून सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय होताना दिसून येत आहे.
अरबी समुद्रातूून पुढे मुंबईपर्यंत धडकलेल्या ओखी चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्टसह राज्यातील बव्हंशी भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून नाशिकमध्ये आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. सोमवारी दुपारपासूनच शहरात आभाळ भरुन आले होते तर आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. हवेत कमालीचा गारठा असून थंडीत पावसाची भर पडल्याने बाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. याशिवाय, हलकेसे वारे वाहत असल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे. सकाळी-सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमन्यांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची धांदल उडाली. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शहरातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीवर परिणाम दिसून येत आहे. थंडी आणि पाऊस असा दुहेरी माऱ्या मुळे त्रस्त बनलेल्या नाशिककरांनी बाहेर न पडणेच पसंत केले आहे. थंडीमुळे अडगळीत टाकून देण्यात आलेले रेनकोटही यानिमित्ताने बाहेर निघाले आहेत. आज सकाळपासून नाशिकमध्ये सूर्यदर्शन झालेले नाही.