निफाड शहरासाठी पर्यायी विद्युत व्यवस्था कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:34 PM2020-05-30T22:34:15+5:302020-05-30T23:52:17+5:30
लॉकडाउनच्या काळामध्ये गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेली वीजवाहिनी सुरू करून निफाड शहराला खंडित वीजपुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे.
एस. एन. चकोर ।
निफाड : लॉकडाउनच्या काळामध्ये गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेली वीजवाहिनी सुरू करून निफाड शहराला खंडित वीजपुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे.
ही जुनी वीजवाहिनी दुरुस्त झाल्याने कसबे सुकेणे उपकेंद्रातून येणाऱ्या वाहिनीवर अचानक बिघाड झाल्यास निफाड शहराला आता तातडीने रानवड वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाली आहे.
निफाड हे तालुक्याचे गाव असून, येथे अनेक शासकीय कार्यालय आहेत. त्याचप्रमाणे उपबाजार आवार, उपजिल्हा रुग्णालय, शाळा, महाविद्यालये, आयटीआय, हॉस्पिटल, शीतगृहे आहेत. त्यामुळे या शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास शहराचे कामकाज मोठ्या प्रमाणात ठप्प होत होते.
कसबे सुकेणे येथील वीज उपकेंद्रातून कुंदेवाडी उपकेंद्रास वीजपुरवठा होतो. त्यानंतर कुंदेवाडी वीज उपकेंद्रातून निफाड शहरास वीजपुरवठा केला जातो. कसबे सुकेणे उपकेंद्रातून आलेल्या वीजवाहिनीत तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वा बिघाड झाल्यास निफाड शहराचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता व निफाडकरांना अंधारात राहावे लागत होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीची दुरुस्तीसाठी धावपळ होत होती.
दुसरीकडे रानवड उपकेंद्रातून निघणारी व कुंदेवाडी उपकेंद्राला जोडणारी जुनी विद्युत वाहिनी गेल्या १३ वर्षांपासून अतिशय जीर्ण असून, बंद अवस्थेत होती. रानवड उपकेंद्र ते कुंदेवाडी उपकेंद्र या दरम्यानच्या या वीज वाहिनीमध्ये खांब, तारा तुटलेल्या व जीर्ण झालेल्या, पीन व डिस्क इन्सुलेटर तुटलेल्या अवस्थेत होते. जर ही बंद असलेली वीजवाहिनी दुरुस्त केली तर त्याद्वारे कुंदेवाडी उपकेंद्राला व निफाड शहराला पर्यायी वीजपुरवठा करता येईल काय? यावर नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी विचार सुरू केला. तशी ही सर्व दुरुस्ती आव्हानात्मक आणि प्रचंड परिश्रमाची होती; परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून बंद पडलेल्या वाहिनीची दुरुस्ती करायची आणि लॉकडाउनच्या काळामध्ये हे काम पूर्ण करून दाखविले.
यासाठी बंकट सुरवसे, आनंदा मोरे, निफाड शहर अभियंता गणेश कुशारे, कंत्राटदार व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लागणाºया साहित्याची ने-आण करण्यासाठी वाहने मिळवताना कसरत करावी लागली त्यातच सूर्य आग ओकत असताना प्रचंड मेहनतीने हे काम पूर्ण केले. सदर दुरु स्ती करताना वीज वितरण कंपनीकडे उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीचा वापर करून कंपनीची आर्थिक बचत केली.
निफाड शहराचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमचा सोडवावा, असे मी मनोमन ठरवले. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यास यश आले. ही बंद पडलेली वीजवाहिनी दुरु स्त झाल्याने निफाड शहराची वर्षानुवर्षाची समस्या सुटल्याचे मला समाधान मिळाले आहे.
- बंकट सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, निफाड