‘नदीजोड’शी सांगड घालून अटल भूजल योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:30+5:302021-09-17T04:19:30+5:30
सिन्नर : तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अटल भूजल योजनेत शासनाने सुचविलेली कामे करून फायदा होणार नसल्याने नदीजोड प्रकल्पाशी ...
सिन्नर : तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अटल भूजल योजनेत शासनाने सुचविलेली कामे करून फायदा होणार नसल्याने नदीजोड प्रकल्पाशी सांगड घालून अटल भूजल योजनेचा आराखडा बनवावा व त्यानुसार विविध विभागांनी कामांचे प्रस्ताव बनवावेत, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी भूजल सर्वेक्षणसह जलसंधारण व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बिडवाल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अंकिता वाघमारे, सरोज जगताप, उपअभियंता डावरे, अविनाश लोखंडे आदी उपस्थित होते. अटल भूजल योजनेत सिन्नर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायती अंतर्गत ८७ गावांचा समावेश झाला आहे; मात्र या योजनेत जी कामे प्रस्तावित आहेत, ती पूर्वीच झाल्याने ती नव्याने करूनही फारसा फायदा होणार नाही. सिन्नरच्या पूर्वभागात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागातील पाणी व प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांतर्गतचे ७ हजार दलघफू पाणी गावोगावच्या शिवारात पोहोचवण्यासाठी अटल भूजल योजनेच्या प्रकल्प अहवालात बदल करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आमदार कोकाटे यांनी प्रकल्प अहवालात गावनिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय बदल करुन तो बनवण्याच्या सूचना केल्या. जलसंधारण विभागाने प्रस्तावित केलेल्या २५ पेक्षा जास्त योजनांचे सादरीकरण उपअभियंता डावरे व अविनाश लोखंडे यांनी केले.
------------------------------
‘नदीजोड अंतर्गत मिळणारे पाणी सर्वत्र पोहोचण्यासाठी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्व योजनांचा एकत्रित डीपीआर बनविणे गरजेचे आहे. या डीपीआरमध्ये शेती, उद्योग व पिण्याचे पाणी यांचे आरक्षण निश्चित करून बनवलेला डीपीआर राज्य शासनाला पाठवण्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर
---------‘जलसंपदाने दिवाळीपर्यंत प्रकल्प अहवाल बनवावा’
नदीजोड प्रकल्पांतर्गत तालुक्यातील कोनांबे धरणात पाणी आल्यानंतर तेथून पुढे ते कालवे व अन्य माध्यमातून वितरित करण्याबाबतचे सर्वेक्षण करून त्याचाही प्रकल्प अहवाल दिवाळीपर्यंत बनवावा, अशी मागणी अधीक्षक अभियंता अहिरराव यांच्याकडे आमदार कोकाटे यांनी केली.
--------------------
जलसंपदा विभागाच्या नाशिक कार्यालयात अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, जीवन बिडवाल, अरुण नाईक, अंकिता वाघमारे, सरोज जगताप, अविनाश लोखंडे आदी.
(१६ सिन्नर कोकाटे)
160921\16nsk_18_16092021_13.jpg
१६ सिन्नर कोकाटे