बांगलादेशच्या आयात कराचा द्राक्ष पंढरीला फटका
By admin | Published: February 27, 2016 09:41 PM2016-02-27T21:41:54+5:302016-02-27T22:10:08+5:30
दुष्काळात तेरावा : उत्पादक चिंतातुर; केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी
कसबे सुकेणे : बांगलादेश सरकारने द्राक्षांवरील आयात कर किलोमागे ६० ते ६२ रुपये केल्याने त्याचा फटका सध्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत असून, द्राक्षांच्या व लोकल बाजारभावात सुधारणा होत नसल्याने द्राक्ष पंढरीत निरुत्साहाचे ढग दाटले आहेत. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालण्याची मागणी उत्पादक करीत आहेत.
द्राक्ष उत्पन्नात देशात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यात देशाच्या विविध भागांतील व्यापारी डेरेदाखल झाले असून, प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत, ओझर, कसबे सुकेणे, उगाव, पालखेड, साकोरेमिग व दिंडोरी तालुक्यातील खेडगाव बाजारपेठेमध्ये द्राक्षांची आवक वाढली असली तरी, बाजारभावात मात्र सुधारणा होत नसल्याने द्राक्ष पंढरीत निरुत्साह संचारला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचा बांगलादेश हा सर्वात मोठा ग्राहक आहे; परंतु बांगलादेश सरकारने आयात कर किलोमागे जवळपास ६० रुपये वाढविल्याने द्राक्षांची मागणी कमी झाली आहे. परिणामी मागणी व पुरवठा यात तफावत झाल्याने बाजारभावात सुधारणा होत नसल्याचे समजते. शिवाय देशांतर्गत प्रमुख बाजारपेठांमध्ये जम्बो काळी व्हरायटीचे सातारा, सांगली भागातील द्राक्षांची सर्वाधिक आवक झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी कमी असल्याचे व्यापाऱ्याकडून समजते. बांगलादेशाच्या वाढीव आयात करामुळे द्राक्ष उत्पादकांना किलोमागे २५ ते ३० रु पये कमी मिळत असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
अत्यल्प पर्जन्यमानात पाण्याचे नियोजन करून विविध संकटांचा सामना करीत जगविलेल्या द्राक्षबागांवर द्राक्ष उत्पादकांनी लाखो रुपये खर्च केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाले आहेत. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी मौजे सुकेणेचे प्रकाश मोगल, सोमनाथ गंगाधर हळदे, सतीश मोगल, विलास मोगल, विजय मोगल, श्याम मोगल, संजय रहाणे, कसबे सुकेणेचे सुमित गांधी, धनंजय भंडारे, बबन शेवकर, दत्ता पाटील यांनी केली आहे.