कागदोपत्रीच उरले महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:18 AM2021-09-07T04:18:08+5:302021-09-07T04:18:08+5:30
जळगाव नेऊर : शासनाने ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटावे या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती हा उपक्रम राबविला, काही ...
जळगाव नेऊर : शासनाने ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटावे या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती हा उपक्रम राबविला, काही वर्ष या समितीचे कार्य चांगले चालले असल्याचे दिसून आले, शिवाय गावपातळीवर याचा चांगल्या प्रकारे प्रभाव निर्माण होण्यास सुरुवात झाली होती; परंतु शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या समित्यांना बसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आजच्या स्थितीला तंटामुक्त समिती केवळ नामधारी राहिली असून त्याचे महत्त्वही कमी झाले आहे. या समित्याचे महत्त्व केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.
गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटवून आपल्या गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली.
दरम्यान आजच्या घडीला समित्या थंडबत्यात गुंडाळुन ठेवल्यासारखे वाटत आहे. जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्या तंटामुक्त समित्या सक्रिय आहेत. बऱ्याचशा समित्या या नावालाच असल्यामुळे शासनाच्या मूळ उद्येशालाच खिळ बसतेय की काय असा प्रश्न सर्व सामान्य जनतेसमोर उभा राहत आहे.
गावागावात क्षुल्लक कारणावरून होणारे तंटे, वाद, विवाद गावातच संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृद्धीकडे न्यावे असा या योजनेचा चांगला हेतू आहे. या योजनेसाठी लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती. ह्या योजनेला सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, गावागातील तंटामुक्त समित्या सक्रियप होत्या.
नाशिक जिल्ह्यात या समित्या पुन्हा सक्रिय झाल्यास गावातील तंटे कमी होतील व पोलिसांचा त्रासही वाचणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनानेही एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. समितीच्या अध्यक्षासह सदस्यांना विश्वासात घेत त्यांना मान, सन्मान दिल्यास आजही खेड्या पाड्यातील वाद विवाद हे गावातच मिटतील, यासाठी वरिष्ठांनी लक्ष घातल्यास या योजनेचा उदात हेतू खऱ्या अर्थाने सफल होईल यात शका नाही.
कोट...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती हि गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून प्रवृत्त करणे यासाठी अस्तित्वात आली आहे. शासनाने तंटामुक्त गाव समितीला प्रोत्साहन देऊन स्व. आर. आर. पाटील यांच्या नावाने निवड झालेल्या तंटामुक्त गावात पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात यावा.
- कोंडाजी शिंदे, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, जळगाव नेऊर.