लक्ष्मीनगरात डासांचा प्रादुर्र्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:15 AM2018-08-25T00:15:03+5:302018-08-25T00:16:55+5:30
महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने मूलभूत सुविधांकडे तरी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सिडको : महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने मूलभूत सुविधांकडे तरी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील लक्ष्मीनगर, इंद्रनगरी भागातील नागरिकांना मनपाकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. येथील लक्ष्मीनगर भागातील खासगी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढलेले असून, याच ठिकाणी नैसर्गिक उघडा नालादेखील आहे. या नाल्याची दुरवस्था झाली असून, नाल्यातून कायमच सरपटणारे प्राणी बाहेर येऊन घरात शिरत असल्याचे प्रकार अनेकदा झाले आहे. खासगी मोकळ्या जागेत वाढलेल्या गाजरगवतामध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात. वाढलेल्या गवतामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून, मागील वर्षी काही नागरिकांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली आहे. याबाबत मनपाने संबंधित जागा मालकावर कारवाई करण्याची गरज असून, मोकळ्या जागेतील घाण व वाढलेले गाजरगवत साफ करण्याची मागणीही येथील रहिवाशांनी केली आहे. याच भागात असलेल्या उद्यानाचे काम रखडले असून, उद्यानाच्या जॉगिंग ट्रॅकवर गाजरगवत वाढलेले आहे. या उद्यानात रात्रीच्यावेळी टवाळखोरांचा वावर असल्याने गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करण्याची गरज आहे.
परिसरातील पथदीप रात्रीच्या वेळी अनेकदा बंद असल्याने चोºया व घरफोड्या झाल्या असल्याचेही नागरिकांनी सांगितले. तसेच अंधार अधिक असल्याने पथदीपांची संख्या वाढवावी. येथील एका ठिकाणी विद्युत पोल आहे; परंतु त्यावर पथदीप नसल्याने तेथे पथदीपांची व्यवस्था करावी, असेही नागरिकांनी सांगितले. मनपाने लक्ष्मीनगर, इंद्रनगरी भागातील मूलभूत समस्या त्वरित सोडविण्याची अपेक्षा संगीता रावते, आशा ढोकळे, वंदना गवळी, कन्हैया परदेशी यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.