मालेगावी रजा अकॅडमीच्या कार्यालयात महत्त्वाचे पुरावे हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:35 AM2021-11-18T01:35:16+5:302021-11-18T01:35:41+5:30
रजा अकॅडमीच्या येथील कार्यालयावरील छापेमारीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हे गोपनीय पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आतापर्यंत ५२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालेगाव : रजा अकॅडमीच्या येथील कार्यालयावरील छापेमारीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हे गोपनीय पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आतापर्यंत ५२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सोमवारी (दि. १५) मध्यरात्री विभागाच्या पोलीस उपाधीक्षक लता दोंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी रजा अकॅडमीच्या कार्यालयावर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे, बंदसंदर्भातली पत्रके, संगणक व इतर साहित्य जप्त केले होते. या कारवाईत महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचा दावा जिल्हा पोलीसप्रमुख पाटील यांनी केला आहे. सापडलेले पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. सध्या सुरू असलेले अटकसत्र सीसीटीव्ही फुटेज व सर्व प्रकारच्या पडताळणी करूनच केली जात आहे. घटनेला चिथावणी देणाऱ्या तसेच मुख्य सूत्रधाराचा तसेच रजा अकॅडमीच्या फरार पदाधिकाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. रजा अकॅडमी कार्यालयाचा काही भाग सील करण्यात आला असून, या ठिकाणी मदरसा व धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू राहतील. यात कुठल्याही प्रकारची बंदी राहणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख पाटील यांनी केले आहे.