तोतया पोलीस निघाले अभियांत्रिकीचे विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:55 PM2019-11-22T23:55:51+5:302019-11-22T23:56:34+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून मालवाहू चारचाकी अडवून पैसे उकळणारे दोघे तोतया पोलीस नाशिक शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले असून, त्यातील एक पोलीस पुत्र व दुसरा पोलिसाचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून मालवाहू चारचाकी अडवून पैसे उकळणारे दोघे तोतया पोलीस नाशिक शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले असून, त्यातील एक पोलीस पुत्र व दुसरा पोलिसाचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमृतधाम चौफुलीवर रस्त्याने ये-जा करणारे मालवाहू मालट्रक अडवत पोलीस असल्याची बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पल्सरवरून पळ काढणाºया तलाठी कॉलनी शिवनगर येथील अक्षय सदाशिव दोंदे (२१) व भूषण अरुण जाधव दोघांना अटक केली होती. दोंदे व जाधव काही दिवसांपासून अमृतधाम चौफुलीवर चारचाकी अडवून ‘आम्ही पोलीस आहोत, वाहनांची कागदपत्रे दाखवा’, असे सांगून पैसे उकळत होते. याबाबत एका चालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून औदुंबरनगरला त्यांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी (एमएच १५ सीएल ३३७२) जप्त केली होती. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांनी कसून चौकशीचे गुन्हे शोध पथकाला आदेश दिले. चौकशी करताच दोघांनी रात्री गाड्या अडवून पैसे उकळत असल्याची कबुली दिली.