बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:16 AM2019-10-05T01:16:58+5:302019-10-05T01:21:32+5:30
भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
नाशिक : भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार बाळासाहेब सानप यांनी बंडखोरी करून राष्टÑवादीत प्रवेश केल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना महाजन यांनी सानप यांना थांबविण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच अद्यापही अर्ज माघारीला कालावधी असल्याने त्यांच्या माघारीसाठी पुन्हा प्रयत्न केले जातील, असेही महाजन यांनी सांगितले. कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात उभा राहून निवडून येऊ शकणार नाही. आता तशी परिस्थितीच नसल्याने बंडखोरांनीदेखील त्याबाबत विचार करून माघारी घेणेच इष्ट असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. माघारी होईपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मनसेदेखील मैदानात उतरला असल्याने त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, घोडामैदान जवळच असून त्यातच निर्णय होईल, असेही महाजन म्हणाले.
खडसेंच्या नाराजीचा विषय संपला एकनाथ खडसे यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली आहे. खडसेंनीदेखील ती मान्य केली आहे. खडसेंच्या संमतीमुळे त्या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे खडसेंच्या नाराजीचा विषय संपला असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.
पैसे घेऊन तिकीटवाटप भाजपत होत नाही
कुणाला तिकीट मिळाले नसल्याने त्यांचे कार्यकर्ते जरी आर्थिक गैरव्यवहारांमुळे तिकीट मिळाले नसल्याचा आरोप करीत असले तरी भाजपमध्ये अशाप्रकारे तिकीट वाटप होत नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कुणी आरोप करीत असतील, तर ते पूर्णपणे खोटे आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.
गितेंची नाराजी दूर
नाशिक मध्य मतदारसंघासह सर्वच मतदारसंघांमधून उमेदवारीसाठी चुरस होती. त्यात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली. इच्छुकांमधून एकालाच उमेदवारी मिळणे शक्य असल्याने इतर इच्छुक नाराज होणे साहजिक असते. त्याप्रमाणेच गितेदेखील नाराज झाले असले तरी ते आता इथे माझ्याबरोबर आणि पक्षासमवेत आहेत. त्यांची नाराजी दूर झाली आहे. ते पक्षाचे उपाध्यक्ष असून, पक्ष पुढे त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल ते ठरवेल, असेही महाजन म्हणाले.