प्रस्तावित ९४ वे साहित्य संमेलन तूर्तास अशक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:20+5:302021-07-25T04:14:20+5:30

नाशिक : प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नाशिकमधील आयोजनाबाबत स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांनी त्यांची भूमिका ३१ जुलैपर्यंत जाहीर ...

Impossible for the proposed 94th Sahitya Sammelan! | प्रस्तावित ९४ वे साहित्य संमेलन तूर्तास अशक्य !

प्रस्तावित ९४ वे साहित्य संमेलन तूर्तास अशक्य !

Next

नाशिक : प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नाशिकमधील आयोजनाबाबत स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांनी त्यांची भूमिका ३१ जुलैपर्यंत जाहीर करावी, म्हणजे त्याबाबत निर्णय घेता येईल, या साहित्य महामंडळाच्या पत्रावर भूमिका स्पष्ट करताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ‘नाशिकमध्ये साहित्य संमेलन तूर्तास अशक्यच’ असे जाहीर केल्याने नाशिकचे प्रस्तावित साहित्य संमेलन रद्दच झाल्याच्या चर्चेला बहर आला आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरत असतानाच्या काळातच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिला होता. त्यामुळे जानेवारीपासूनच सुरू झालेल्या पडघमनंतर २६ ते २८ मार्च या तीन दिवसांत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि लोकहितवादी मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्यानंतरच्या काळात संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह म्हणून जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ, तर संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात फेब्रुवारीमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात प्रस्तावित साहित्य संमेलन हे काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा बहर ओसरल्यानंतर मे किंवा जून महिन्यात त्याचे आयोजन करण्याचा महामंडळाचा आणि आयोजक लोकहितवादी संस्थेचा विचार होता. मात्र, मेअखेरपर्यंत कोरोना कायम असला आणि जूनमध्ये ओसरू लागला तरी तिसऱ्या लाटेची दहशत कायम होती. दरम्यानच्या काळात महामंडळाच्या अध्यक्षांनी नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनातील कथित गैरप्रकारांबाबत वाच्यता केल्यानंतर त्याबाबत प्रदीर्घ काळ चर्चा रंगली. या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी प्रमुख कार्यवाह तथा निमंत्रकांना सविस्तर पत्र पाठवून त्याद्वारे संमेलन आयोजनाच्या शक्यतेबाबत त्वरित खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

इन्फो

संमेलन आयोजनाबाबत करावा खुलासा

ठाले पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात संमेलन स्थगितीबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवणे शक्य नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे नाशिकला संमेलन घेण्यासारखी स्थिती आहे का? संमेलनास शासन, प्रशासन अनुकूल प्रतिसाद देईला का, आयोजक संस्था आणि स्वागत मंडळाची संमेलन घेण्याची तयारी आहे का, तयारी असेल तर कोणत्या महिन्याच्या कोणत्या आठवड्यात संमेलन घेण्याची तयारी आहे, गत आर्थिक वर्ष उलटून गेल्याने अनुदान नाकारल्यासही आटोपशीर खर्चातील संमेलनासाठी आवश्यक निधी जमा होईल का, या सर्व प्रश्नांचा विचार करून भूमिका स्पष्टपणे कळविण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

इन्फो

काहीच न कळविल्यास अनुत्सुक

नाशिकच्या स्वागत मंडळाची भूमिका जाणून घेतल्यावर संमेलन दीडेक महिना स्थगित करायचे की तूर्त नाशिकपुरते साहित्य संमेलन करायचे आणि झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून सर्वांना त्यातून मुक्त करायचे, याचा निर्णय साहित्य महामंडळाला घेता येईल. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत भूमिका कळवावी. भूमिका न कळविल्यास साहित्य संमेलन घेण्यास आपण उत्सुक नाही, असा अर्थ होईल, असेदेखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

इन्फो

तिसऱ्या लाटेची शक्यता

महामंडळाच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी नाशिकच्या परिस्थितीची स्पष्ट जाणीव करून दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नाशिककर आता कुठे सावरत आहेत. त्यात पुढील महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रस्तावित संमेलनात हजारो नागरिक एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. आम्ही ओबीसी आंदोलनदेखील थांबविले आहे. अशा परिस्थितीत तूर्तास साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो

छगन भुजबळ आणि साहित्य संमेलन लोगो वापरावा.

Web Title: Impossible for the proposed 94th Sahitya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.