भोंदू अशोक खरातने गाठली विकृतीची सीमा; आणखी दोन गुन्हे, रुपाली चाकणकरांना अटक करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:42 IST2026-03-23T05:41:09+5:302026-03-23T05:42:00+5:30
राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.

भोंदू अशोक खरातने गाठली विकृतीची सीमा; आणखी दोन गुन्हे, रुपाली चाकणकरांना अटक करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचे सांगत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तर अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा दुसरा गुन्हा रविवारी नाशिक पोलिसांनी दाखल केला. त्यामुळे विकृत खरातवर महिला अत्याचाराचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. खरातला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. ईशान्येश्र्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्महाऊस कर्मचारी आणि आठ जणांची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली.
पीडितेने दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका ३३ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार खरात याने तिचा विवाह झाल्यानंतरही वारंवार बळजबरी केली तसेच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचा आरोप केला आहे. लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करण्यासाठीही खरातने पुन्हा महिलेला बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी हाेत आहे.
... अन् दैवी शक्तीचा दावा करणारा भाेंदूबाबा खरात म्हणाला, बोलायलाही शक्ती नाही !
आपल्याकडे दैवी शक्ती असल्याच्या मोठमोठ्या बढाया मारणारा भोंदू खरात याला रविवारी नाशिक पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला‘ या राज्यभर गाजलेल्या पॅटर्ननुसार रविवारी सायंकाळी चौकशीप्रसंगी खरात याची ‘वरात‘ काढली गेली. यावेळी एक-दोन वेळा क्षीण आवाजात कसेबसे ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला‘ म्हणताना खरात याने आपल्यात बोलायची ताकदही नसल्याचे सांगितले. याची चित्रफीत व्हायरल झाली असून सर्व स्तरातून त्याबाबत पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत होत आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे दावे करणाऱ्या भोंदू खरात याला आता पोलिसांसमोर बोलण्याची शक्ती सुद्धा न उरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही
फिर्यादीनुसार, आरोपी अशोककुमार एकनाथ खरात (वय ६७) याने कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज येथील कार्यालयात गर्भवती महिलेवर ‘पूजा विधी’च्या नावाखाली अमानुष अत्याचार केले. अगोदर महिलेच्या पोटावर व शरीरावर हात फिरवून नंतर तिच्यावर बलात्कार करत शीलभंग केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रथम तुला मुलगा हवा की मुलगी असे खरात याने तिला विचारल्यानंतर तिने काहीही होवो मात्र ते चांगले असावे असे सांगितले. त्यासाठी विधी करण्याच्या नावाखाली थोरात याने पीडितेच्या पतीला बाहेर बसवून आरोपी महिलेवर अत्याचार केला असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एसआयटी तपासाला वेग...
नवी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांना खरातकडून काही माहिती आवश्यक असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटी पथकाला पत्र दिले. त्यानंतर दुपारी खरातला क्राइम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथक अधिक सक्रिय झाले असून, तपास केंद्र अन्यत्र हलविण्यात आले आहे. पथकात नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून पीडित महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नकली साप आणि वाघाचे कातडे...
आरोपी खरात नकली साप व वाघाचे कातडे वापरून लोकांमध्ये भीती निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा हा साप हालताना दिसल्यावर उपायांसाठी येणाऱ्यांना अदभूत वाटत असे.
या प्रकरणी सर्व पुरावे आहेत, कुणाला सोडणार नाही : मुख्यमंत्री
नागपूर : भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अत्यंत गंभीर असून गुप्तचर माहितीच्या आधारे राज्य सरकार आणि पोलिसांनीच नियोजनबद्ध पद्धतीने याचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. विरोधी पक्षातील कोण कोण खरातकडे गेले होते, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे ठामपणे सांगत सामाजिक दबावामुळे पीडित महिला सुरुवातीला पुढे येत नव्हत्या. आता सरकार व पोलिस त्यांना धीर देत असून काही महिलांनी पुढे येण्यास सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मंत्र्यांसोबत फोटो असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. फोटोवरून निष्कर्ष काढता येत नाहीत. मात्र, ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरातच्या संस्थेला ४० किमीवरून पाणी दिले, त्यांना काय शिक्षा द्यायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.