नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Published: June 6, 2017 03:46 AM2017-06-06T03:46:19+5:302017-06-06T03:46:29+5:30

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

Impressive response to the shutdown in Nashik district | नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे प्रकार तर खडक माळेगाव येथे झालेला लाठीमार असे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. ठिकठिकाणी झालेले रास्तारोको, मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन,मेणबत्ती मोर्चा आदिंनी हे आंदोलन झाले.यामुळे ग्रामीण भागातील उलाढाल तसेच व्यवहार ठप्प झाले होते. शहरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.
किसान क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. या बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता.सर्वच ठिकाणी सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. मात्र या बंदचे शहार भागामध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. निफाड, कळवण, दिंडोरी,सुरगाणा, मालेगाव, येवला, त्र्यंबकेश्वर, सिन्नर अशा सर्वच तालुक्यांमध्ये आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे काही तरुण शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर जळती टायर टाकून रास्तारोको केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंदोलकांनी एस. टी. बसवर दगडपेक करून काचा फोडल्या.विविध ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

Web Title: Impressive response to the shutdown in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.