नादुरुस्त वाहनामुळे वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:11+5:302021-01-22T04:14:11+5:30
मुंबई महामार्गावरून पुणे महामार्गावर ये-जा करण्यासाठी जॉगिंग ट्रॅकलगतचा रस्ता जवळचा मार्ग आहे. त्यामुळे परिसरात असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात ...
मुंबई महामार्गावरून पुणे महामार्गावर ये-जा करण्यासाठी जॉगिंग ट्रॅकलगतचा रस्ता जवळचा मार्ग आहे. त्यामुळे परिसरात असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी जॉगिंग ट्रॅकलगतच्या रस्त्याचा वापर करत असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. सदरचा रस्ता वाहतुकीस अरुंद पडत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार जॉगिंग ट्रॅकलगतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु, जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या सुचितानगरमधील गॅरेजधारकांनी नादुरुस्त वाहने या रस्त्यावरच उभी केली आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचा ताबा गॅरेजधारकांनी घेतल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर लावण्यात आलेली नादुरुस्त वाहने बाजूला सारून वाहतुकीचा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट : पूर्व प्रभाग सभेत जॉगिंग ट्रॅकलगतच्या रस्त्यावर नादुरुस्त वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. तरी, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.