आधी सेवा सुधारा, मग करा दरवाढीचा विचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:36 AM2018-07-12T00:36:29+5:302018-07-12T00:36:47+5:30
वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
नाशिक : वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. त्रुटींची भरपाई करताना त्याचा भार सातत्याने ग्राहकांवर टाकला जात आहे. त्याऐवजी इतर पर्यायांचा मंडळाने विचार करावा, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायत समिती सदस्य, सर्वसामान्य नागरिक, माजी मुख्य अभियंता यांच्याशी साधलेला हा संवाद.
वीज दरवाढ ही नैमित्तिक गोष्ट बनली आहे. दरवाढ करण्याआधी पुरवठा कसा आहे? सेवा कशी आहे? वसुली पूर्णपणे होते का?, गैरप्रकारांचे काय? या प्रश्नांची उत्तरे मंडळाने द्यावीत. वीजचोरी कमी व्हायचे नाव घेत नाही. असे असताना शासनाने वीज दरवाढीचा विचारही करू नये. - दिलीप फडके
वीज दरवाढ या गोष्टीला समर्थनच असू शकत नाही. ही ग्राहक हिताविरोधी कृती आहे. कारण आधीच विजेचे दर जास्त आहे. त्यात खोटे हिशेब, अवास्तव बिल या अनुचित प्रथांमुळे ग्राहक भरडला जात आहे. शेतकऱ्यांना अंदाजे बिल देऊन त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून दरवाढीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. ४० टक्के कृषी ग्राहकांना अंदाजपंचे बिल दिले जाते. - विलास देवळे
वीज खरेदीचे दर कमी होत असताना वीज दरवाढ का केली जात आहे हे समजत नाही. कृषी क्षेत्राला अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षात आलेले उत्पन्न पाहता जास्त महसूल आलेला दिसतो आहे; मात्र प्रत्यक्ष थकबाकी खूप आहे. वसुलीचे गांभीर्य दिसत नाही. प्रस्तावित दरवाढीत कृषिपंपांची दरवाढ खूपच जास्त आहे. गळती कमी झाली आहे तरीही वीज दरवाढ होते आहे हे चुकीचे आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी भरडले जाणार आहेत. - अरविंद गडाख, माजी मुख्य अभियंता, वीज महामंडळ