सुधारित निर्णय : पुढीलवर्षी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा असेल तरच सवलत विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:27 AM2017-12-22T01:27:01+5:302017-12-22T01:27:14+5:30
नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात.
नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र गुणदान पद्धत आणि यासंदर्भातील अटींविषयी प्रचंड तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला असून, सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थी निव्वळ इंटरमिजिएट उत्तीर्ण असला तरी त्यास सवलतीचे गुण मिळणार आहे. मात्र ही सवलत केवळ एकाच वर्षासाठी असून, पुढीलवर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जात असल्याने निकालाचा फुगवटा वाढल्याची ओरड होते. शिक्षणक्षेत्रातून तर याविषयी संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. असे असले तरी बालमानसशास्त्र आणि मुलांमधील आक्रमकता यांचाही विचार झाला पाहिजे, अशी भूमिका बालमानसशास्त्रज्ञांनी मांडल्यामुळे सवलतीच्या गुणांबाबत विचार करताना शिक्षण विभागाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. कलाक्षेत्राची सेवा करणाºया दहावीच्या विद्यार्थ्याला त्याच्या कौशल्याचे गुण मिळावेत म्हणून कलाक्षेत्राशी निगडित विद्यार्थ्याला दहावीत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असे करताना काही अटी लादण्यात आल्या होत्या. त्यास कलाशिक्षकांच्या संघटनांनी वारंवार विरोध करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार या निर्णयात काहीअंशी बदल करण्यात आले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निर्णयानुसार ‘एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय विद्यार्थ्याला इंटरमिजीएट ड्रॉर्इंग परीक्षेचे अतिरिक्त गुण दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु यात आता बदल करण्यात आला असून केवळ इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यालाही सात गुण दिले जाणार आहे. एलिमेंटरी परीक्षा न देताही आता विद्यार्थी इंटरमिजीएटला अतिरिक्त गुणांचा लाभ होऊ शकतो. मात्र हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी ठेवण्यात आला असून पुढीलवर्षी म्हणजेच २०१९ मार्च महिन्याच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.