जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:25 PM2018-08-09T23:25:45+5:302018-08-10T00:41:46+5:30
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. मालेगाव तालुक्यातील टेहरे येथे तीन तास रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिन्नर तालुक्यात शासनाच्या निषेधार्थ टायर जाळण्यात आले. येवला तालुक्यात ठिकठिकाणी शांततेत आंदोलन करण्यात आले. कळवण, लासलगाव, दिंडोरी, नांदगावसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. मालेगाव तालुक्यातील टेहरे येथे तीन तास रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिन्नर तालुक्यात शासनाच्या निषेधार्थ टायर जाळण्यात आले. येवला तालुक्यात ठिकठिकाणी शांततेत आंदोलन करण्यात आले. कळवण, लासलगाव, दिंडोरी, नांदगावसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
मालेगाव : शहरासह टेहरे, दाभाडी, कटवाडी, आघार, खडकीसह तालुक्यातील इतर गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे फाटा येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. तालुक्यातील दाभाडी, आघार बु।।, चाळीसगाव फाटा, कौळाणे फाटा, कळवाडी, मनमाड चौफुली, चंदनपुरी आदी ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले तर या आंदोलनामुळे मालेगाव आगाराची बससेवा बंद ठेवण्यात आली होती.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य मराठा समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनाला मालेगाव तालुका सकल मराठा समाजाने प्रतिसाद दिला. मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
दिवसभर व्यवहार ठप्प होते तर शहरालगतच्या टेहरे फाट्यावर मुख्य आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. टेहरे ग्रामस्थांसह तालुक्यातील विविध गावांतील सकल मराठा समाजाच्या महिलांनी व नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी डॉ. तुषार शेवाळे, राजेंद्र भोसले, प्रसाद हिरे, संदीप पाटील, अमोल निकम, चंद्रकांत निकम, देवा पाटील, आर.के. बच्छाव, समाधान शेवाळे, रवींद्र सूर्यवंशी, अंबू निकम, अविनाश निकम, प्रभाकर शेवाळे, संदीप शेवाळे, अरुण पाटील, आर. डी. निकम, नाना शेवाळे आदींनी भाषणे केली. सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे येथील मालेगाव आगाराने बससेवा दिवसभर बंद ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून बसस्थानकातच ६५ बसेस उभ्या ठेवण्यात आल्या होत्या. बससेवा ठप्प असल्यामुळे आगाराचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.शहर व तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन सुरू असताना शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सायंकाळी उशिरा शहरातील दुकाने व मार्केट सुरू झाले होते. शहरासह तालुक्यातील टेहरे, दाभाडी, झोडगे, कळवाडी, खडकी, वºहाणे आदींसह इतर गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता.राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवल्याने दिंडोरी बस वाहतूक पूर्णपणे बंद होती. बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. यावेळी खासगी प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू होती.
दिंडोरी : मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. नगरपंचायती- जवळील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. दिंडोरी येथे तहसीलवर मोर्चातहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, प्रमोद देशमुख, सचिन देशमुख, प्रकाश शिंदे, सोमनाथ जाधव, मनोज ढिकले, नितीन देशमुख, किशोर देशमुख, सचिन जाधव, संतोष मुरकुटे, माधवराव साळुंखे, संगम देशमुख, प्रशांत मोगल, सुनील जाधव, गुलाब जाधव, टिल्लू शिंदे, नीलेश पेलमहाले, शिवाजी पिंगळे, काका देशमुख, रवि घुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तीन तास वाहतूक ठप्पटेहरे येथे तब्बल तीन तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी प्रांत अधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात तरुणांनी हातात भगवे झेंडे घेतले होते. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. टेहरे येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व सकल मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घेत तब्बल तीन तासांनंतर आंदोलन स्थगित केले. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या आंदोलनात तालुक्यातील सकल मराठा समाज सहभागी झाला होता. पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सिन्नर तालुक्यात टायर पेटवून निषेध
सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सिन्नर तालुक्यातील शिवडे व दहीवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून शासनाचा निषेध केला.
शिवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. चौकात टायर पेटवून राज्यकर्त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.