मालेगावच्या स्थितीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:42 PM2020-06-08T22:42:56+5:302020-06-09T00:02:58+5:30

राज्यात सर्वत्र कोरोनाने नागरिकांच्या ऊरात धडकी भरवली असताना मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस रुग्ण बरे होण्याचा आलेख उंचावत आहे. सुमारे ८६ टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली असून, बरे होणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाचे प्रमाण अधिक आहे. परिणामी कोरोनाची असणारी दहशत काही प्रमाणात कमी झाली असून, नागरिक उत्स्फूर्तपणे तपासणी करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत.

Improvement in the condition of Malegaon | मालेगावच्या स्थितीत सुधारणा

मालेगावी गूळबाजारातील वर्दळ.

googlenewsNext
ठळक मुद्देदिलासा : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; तरुणांचे प्रमाण अधिक

शफीक शेख ।
मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाने नागरिकांच्या ऊरात धडकी भरवली असताना मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस रुग्ण बरे होण्याचा आलेख उंचावत आहे. सुमारे ८६ टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली असून, बरे होणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाचे प्रमाण अधिक आहे. परिणामी कोरोनाची असणारी दहशत काही प्रमाणात कमी झाली असून, नागरिक उत्स्फूर्तपणे तपासणी करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत.
कोरोना पहिल्या टप्प्यात असतानाच उपचारार्थ रग्ण दाखल झाल्यास तो हमखास बरा होतो असाच संदेश नागरिकांत गेला असून त्यासाठी मेहनत घेणाºया डॉक्टर वर्गातही उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मालेगावात मात्र मोठ्या संख्येने उपचार करून घरी जात असल्याचे चित्र आहे. आता केवळ ८३ रुग्ण उपचार घेत आहेत.
मालेगावात कोरोनाची महामारी सुरू झाली. त्यावेळी सर्वाधिक रुग्ण मिळून आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले होते. कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून समजले जाणाºया मालेगावातील रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यातील इतर रुग्णांपेक्षा अधिक असल्याने पुन्हा मालेगावने लक्ष वेधून घेतले आहे मालेगावातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचार घेऊन बरे होण्यात पुरुषांची संख्या दुप्पट आहे, तर महिलांची संख्या निम्म्याने कमी आहे. मालेगावात रविवारपर्यंत (दि.७) ६४१ जणांना बरे वाटत असल्याने घरी सोडण्यात आले होते. त्यात ४३३ पुरुष आणि ८०८ महिलांचा समावेश होता. कोरोना रुग्णांवर उपचार करताना बाधित झालेले १८ डॉक्टरदेखील कोरोनामुक्त झाले आहेत.
साधारणपणे १ ते १० वर्षे वयोगटात ३२ बालकांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय ११ ते २० वयोगटातील ७१ लहान मुलांनीदेखील कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन विजय मिळविला आहे. २१ ते ३० वयोगटातील तरुणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील सुमारे १५१ तरुण ठणठणीत बरे झाले असून, औषधोपचारानंतर त्यांना बरे वाटत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कोरोनायोद्ध्यांना घरी सोडले आहे. त्या खालोखाल ३१ ते ४० वयोगटातील सुमारे दीडशे तरुण बाधित झाल्याने उपचार घेत होते. त्यातील १४६ तरुणांनी कोरोनावर विजय मिळविला.
४ चाळिशीनंतर बाधित झालेल्यांची संख्यादेखील मोठी होती. ४० ते ५० वयोगटातील सुमारे ११० जणदेखील कोरोनाशी संघर्ष करून बरे झाले असून, घरी रवाना झाले आहेत. तरुणांमध्ये ५१ ते ७० वयोगट किंवा त्यापुढील बाधितांवर उपचार करून घरी जाणाºयांची संख्या मात्र कमी आहे. ५१ ते ६० वयोगटातील ८७ जण बरे झाले, तर ६१ ते ७० वयोगटातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत. ७० वर्षे वयाच्या पुढील कोरोनाबाधित ९ जण कोरोनाशी लढाई लढण्यात यशस्वी ठरले असून, त्यांनाही घरी रवाना करण्यात आले आहे.

मालेगावी कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर समोर तीन पर्याय होते. त्यात रुग्णांची ट्रेसिंग करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. बाधितांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. यामुळे रुग्ण वेळेत उपचारासाठी घराबाहेर पडल्याने त्यांच्यावर लवकर इलाज करता आले. त्यामुळे त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले. आता लोक उत्स्फूर्तपणे स्वॅब देण्यासाठी पुढे येत आहेत.
- दीपक कासार, आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव

Web Title: Improvement in the condition of Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.