सुधारणा : वैद्यकीय व्यावसायिकांवर आजपासून कारवाईचा बडगा अडीचशे रुग्णालयांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:54 AM2018-04-02T00:54:02+5:302018-04-02T00:54:02+5:30
नाशिक : अनियमित रुग्णालयांवर महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.१) होणारी कारवाई टळली असली तरी सोमवारपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
नाशिक : अनियमित रुग्णालयांवर महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.१) होणारी कारवाई टळली असली तरी सोमवारपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छोट्या रुग्णालयांसंदर्भात माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी काढलेला तोडगा विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, त्यांनी तो मान्य केल्यास सुमारे अडीचशे ते पावणे तीनशे रुग्णालयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रुग्णालयांना पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर आता महापालिकेने जागा वापरात बदल तसेच अग्निशमन दलाच्या नव्या नियमानुसार फायर आॅडिट न केलेले दवाखाने आणि रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर तोडगे काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु महापालिकेकडून रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असल्याने लाखो रुपयांचे प्रीमियमची भरपाई करण्यास सांगण्यात येणार आहे. मुळात अशाप्रकारची भरपाई केल्यानंतरही संबंधित रुग्णालयाच्या पार्किंग स्टेअरकेसमध्ये बदल होणार नसताना केवळ दंड करण्याचे काम सुरू असल्याची भावना वैद्यकीय व्यावसायिक करीत आहेत. त्यानुसार महापालिकेने प्रीमियम भरून नियमित रुग्णालये न करणारे, फायर आॅडिटअभावी प्रलंबित परवानग्या तसेच वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण रखडलेल्या सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांवर १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे ठरविले होते. परंतु रविवारी कोणतीही कारवाई करण्यात आली नसली तरी आता सोमवारपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी छोट्या रुग्णालयांनी बांधकाम खर्चा (कन्स्ट्रक्शन कॉस्ट)च्या दहा टक्के रक्कम दंड म्हणून भरून पंधरा बेडचे रुग्णालय सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. नागरिकांचे मेडिक्लेम मंजूर करण्यासाठी किमान पंधरा बेडचे रुग्णालय असणे आवश्यक असल्याने वैद्यकीय व्यावसायिकांबरोबरच नागरिकांचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी परिपत्रक तयार केले होते, मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ते दडपून ठेवले होते. महत्प्रयासाने गुरुवारी हे पत्र उपलब्ध झाले असून, सोमवारी (दि. २) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. या परिपत्रकाच्या आधारे शहरातील किमान अडीचशे ते पावणे तीनशे रुग्णालयांच्या परवानगीचा प्रश्न सुटणार आहे, असे आयएमएच्या वतीने सांगण्यात आले.