हॉकर्स झोनमध्ये आता बदल अशक्य आयुक्त : झोनमध्ये बदल सुचविताना पर्यायही द्यावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:42 AM2018-01-05T00:42:58+5:302018-01-05T00:43:48+5:30
नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणानुसार शहराचा हॉकर्स झोनचा आराखडा तयार होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे.
नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणानुसार शहराचा हॉकर्स झोनचा आराखडा तयार होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे. आता त्यात काही चुकीचे काम झाले असेल तर दुरुस्त्या केल्या जातील परंतु, दुरुस्त्या सुचविताना लोकप्रतिनिधींना पर्यायही द्यावे लागणार आहे. त्याशिवाय, झोनमध्ये बदल होऊ शकणार नसल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी (दि.४) झालेल्या महासभेत हॉकर्स झोनच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता सदस्यांनी हॉकर्स झोनमध्ये चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा आरोप केला होता. सदर हॉकर्स झोनच्या आराखड्यात बदल सुचविण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलाविण्याची मागणीही सदस्यांनी केली होती. त्यानुसार, महापौर रंजना भानसी यांनी हॉकर्स झोनसंबंधी सूचनांकरिता विशेष महासभा बोलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, हॉकर्स झोनच्या आराखड्यात महासभेनेच मंजुरी दिलेली आहे. त्यानुसारच प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे. हॉकर्स झोनमध्ये काही क्षेत्र निश्चित करताना चुका झाल्या असतील तर त्यात दुरुस्ती केली जाईल. परंतु, त्यात बदल करताना लोकप्रतिनिधींना पर्यायही द्यावे लागणार आहेत. पर्याय दिल्याशिवाय हॉकर्स झोनच्या आराखड्यात बदल अशक्य असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, हॉकर्स झोन आराखड्यानुसार सहाही विभागात झोनमध्ये विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासंदर्भातील फलकही लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात हॉकर्स झोनच्या बाबतीत सर्वाधिक काम हे नाशिक महापालिकेमार्फत सुरू असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.