ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांमध्ये सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:50 PM2018-09-07T17:50:37+5:302018-09-07T17:51:02+5:30
सिन्नर तालुकाभर महिन्यासाठी सरू असलेल्या ग्राम बाल विकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांमध्ये समाधानकारक सुधारणा बघावयास मिळाली. केंद्रात दाखल झालेल्या २३२ अतितीव्र कुपोषित मुलांपैकी १२६ मुले मध्यम श्रेणीत गेली. ७३ मुले साधारण श्रेणीत आली आहेत. तर ८७४ मध्यम तीव्र कुपोषित मुलांपैकी ७०१ मुले ही साधारण श्रेणीत आली आहे.
उपचार घेवून देखील सुधारणा न झालेल्या कुपोषित मुलांसाठी ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या स्तरावर पोषण पुर्नभरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केली आहे. शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषण निर्मूलनावर काम करत असताना तालुकाभर ग्राम बाल विकास केंद्रांना कोकाटे यांनी भेटी दिल्या. अनेक ० ते ६ वयोगटातील मुले ३ वर्ष वय झाले की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यामुळे त्यांना पालक हे आंगणवाडीत पाठवत नाहीत. त्यामुळे अशी मुले अतितीव्र कुपोषित किंवा मध्यम कुपोषित असून देखील पालक याबाबत अनभिज्ञ आहेत. अशा मुलांची जबाबदारी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर द्यावी. या खासगी शाळांमध्ये ग्राम बाल विकास केंद्रासारखे उपक्रम राबविण्याची गरज असल्याच्या त्या म्हणाल्या. वारंवार सूचना करून देखील उंचीच्या पट्ट्या व वजनाचे काटे नादुरूस्त आहेत. अनेक ठिकाणी अंगणवाड्या या झाडाखाली व पत्र्याच्या शेडमध्ये भरतात. ३४८ मोठ्या आंगणवाड्यांपैकी फक्त २३६ अंगणवाड्यांना इमारती आहेत. काही ठिकाणी सेविका व तर काही ठिकाणी मदतनीस यांच्या जागा रिक्त असल्याने एका व्यक्तीची फरपट होत होत आहे. तेव्हा रिक्त जागा भरणे व बचतगटांचे देयके वेळेत द्यावे, अशी मागणीही कोकाटे यांनी केली आहे.