कोरोनाबाधित दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:51 PM2020-04-07T23:51:53+5:302020-04-07T23:52:24+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणतीही गुंतागुंत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणतीही गुंतागुंत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता, तर सोमवारी नाशिक शहरातील मध्यवर्ती एका उच्चभ्रू भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. या दोन्ही रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य सर्वांचीच वैद्यकीय तपासणी केली जात असून, काहींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दोन झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, सर्वच प्रकारच्या हालचालींवर यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागात सापडलेल्या बाधित रुग्णावर सुरू असलेल्या उपचारामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे. आता आणखी एका रुग्णाची भर पडली असली तर हे दोन्ही रुग्ण स्थिर असून, उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.
दरम्यान, शहरात आढळून आलेला कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्रारंभ करण्यात आला आहे. संबंधिताच्या कुटुंबातील व्यक्तींचीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. परिसरातील नागरिकांकडून वैद्यकीय पथकाला प्रतिसाद दिला जात आहे. नागरिक स्वत:हून उपचारासाठी पुढे येत असल्याची सकारात्मक बाब याठिकाणी दिसून आली. स्थानिक नागरिकांनी वैद्यकीय पथकाला संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी केली असून, तसे आवाहन त्यांनी परिसरातील सोसायटी, कॉलनीतील नागरिकांनादेखील केले आहे.
आंतरराष्ट्रीय निर्देशानुसार एकदा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या थुंकीच्या नमुन्याची दोन वेळा तपासणी करावी लागते. त्यानुसार बुधवारी पहिल्यांदा त्या रुग्णाच्या नमुन्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा नमुन्याची तपासणी केली जाऊन दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्याबाबतची अधिकृत घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.
पहिल्या कोरोनाबाधिताच्या नमुन्याची आज फेरतपासणी
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती होत असून, या रुग्णाच्या पहिल्या फेरतपासणीसाठी बुधवारी त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. निफाड तालुक्यातील या व्यक्तीच्या प्रकृतीत गत दहा दिवसांपासून चांगली प्रगती होत आहे. त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गत आठवड्याच्या तुलनेत त्याची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी त्याच्या नमुन्याची तपासणी ही नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तो रुग्ण आता सामान्य व्यक्तीप्रमाणे श्वसन करीत असून त्याला कोणताही कृत्रिम श्वासोच्छ्वास लावण्यात आलेला नाही. आहार-विहारातदेखील त्याने समाधानकारक प्रगती साधली असल्याने बुधवारी होणारी त्याच्या नमुन्याची फेरतपासणी नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नाशिकमधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत प्रभावीपणे त्याच्यावर उपचार केले. त्या सर्व बाबींचा परिणाम म्हणूनच पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णावर अत्यंत वेगाने सकारात्मक बदल घडून आले आहेत.