नाशकातील अन्य तीन बाधितांच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:06 AM2020-04-16T00:06:18+5:302020-04-16T00:06:39+5:30
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची उत्साहात घरवापसी केल्यानंतर आता शहरातील अन्य तिघा बाधितांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह प्रशासनालाही मोठा दिलासा लाभला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची उत्साहात घरवापसी केल्यानंतर आता शहरातील अन्य तिघा बाधितांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह प्रशासनालाही मोठा दिलासा लाभला आहे.
मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉट स्पॉट होऊ पाहत असतानाच नाशिक शहरातील कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिलासादायी चित्र आहे. शहरात आतापर्यंत चार कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून यापूर्वी दाखल असलेल्या तीन रुग्णांच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या तिघांपैकी एका रुग्णाच्या घशाचा स्वाब पुन्हा एकदा शुक्रवारी (दि.१७) चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य दोघा रुग्णांचीही तपासणी होईल. या रुग्णांचेही अहवाल निगेटीव्ह येण्याची आशा उपचार करणाºया डॉक्टरांना आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील आणखी पाच बाधित
नाशिक शहरात एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर मालेगावच्या नमुन्यांमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण ४६ जण कोरोनाबाधित झाले आहेत.
बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ५० नमुन्यांच्या अहवालात नाशिकचा एक युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बाधित युवक हा मनपाने उभारलेल्या निवासी शिबिरातील रहिवासी होता. मालेगावमधील वाढलेल्या ४ रुग्णांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक शहरातील रुग्ण संख्या आता ४ झाली असून, मालेगावमध्ये ३९ व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
नामपूरचे ग्रामीण रुग्णालयच सील
च्बागलाण तालुक्यातील नामपूर परिसरातील एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नामपूरचे ग्रामीण आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला असून, त्यांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.