टोमॅटोच्या भावात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:43 AM2019-01-05T00:43:47+5:302019-01-05T00:44:17+5:30
नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.
पंचवटी : गेल्या वर्षी टोमॅटो मालाची प्रचंड लागवड झाल्याने बाजारभाव पूर्णपणे घसरले होते. लागवड तसेच उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने व त्यातच कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकºयांनी टोमॅटोचा खुडा बंद केला होता तर काहींनी शेतातील उभ्या पिकाकडे दुर्लक्ष करून टोमॅटो जनावरांना सोडून दिला होता. मात्र नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.
गेल्यावर्षी तीन ते चार रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया टोमॅटो मालाला शेतकºयांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाला १५ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठवडाभरापासून बाजारभावात तेजी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई शहर तसेच डहाणू व पालघर या उपनगरात निर्यात केली जात आहे. गुजरात राज्यात सध्या स्थानिक शेतमालाची आवक सुरू झाल्याने गुजरातला नाशिकमधून टोमॅटो मालाची निर्यात बंदच आहे. जुलै ते सप्टेंबर हा टोमॅटो उत्पादनाचा हंगाम असून गेल्यावर्षी याच कालावधीत टोमॅटो मालाची प्रचंड उत्पादन वाढल्याने त्यातच पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने बाजारभाव ४ रुपये किलोपर्यंत कोलमडले होते. उत्पादन तसेच लागवड खर्च न सुटल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून शेतातील उभ्या टोमॅटोच्या पिकाकडे पाठ फिरविली होती. सध्या हिवाळा सुरू असल्याने तसेच अनेक शेतकºयांनी बाजारभाव नसल्याने यापूर्वीच टोमॅटो पीक काढून टाकल्याने आवक घटली आहे. सध्या बाजारात नवीन टोमॅटो माल विक्रीसाठी दाखल होत असल्याने व आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. टोमॅटोच्या २० किलो वजनी प्रति जाळीला ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने या बाजारभावामुळे शेतकºयांनी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.