प्रदूषणमुक्तीसाठी वाहतूक व्यवस्था सुधारावी : सेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:01 AM2018-07-28T01:01:45+5:302018-07-28T01:01:59+5:30
शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले.
नाशिक : शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कायार्लयात शुक्रवारी (दि. २७) प्रदूषणमुक्त जिल्हा संकल्पनेबाबत बैठक झाली, त्यात सेठ बोलत होते. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सेठ यांनी प्रदूषणमुक्त जिल्हा होण्यासाठी शहरात हवेच्या प्रदूषणाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त केली. अपारंपरिक उर्जेचा वापर वाढविण्यासोबतच सौरऊर्जा व पवनउर्जेसारख्या नैसर्गिक उर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे राजीव सेठ म्हणाले. तसेच स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील नागरिकांनीही स्मार्ट होण्याची गरज असून, अनावश्यक ठिकाणी वाहनांचा वापर टाळून पायी चालण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी वाढत्या शहरीकरणात प्रदूषणाचा विषय गंभीर होत असताना त्यावर प्रदूषणमुक्त शहराची संकल्पना साकारण्याचे आवाहन केले.
नियंत्रणावर लक्ष
नाशिक प्रगत शहरापैकी एक शहर असले तरी येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. प्रचंड संख्येने वाढणाºया वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. भविष्यात वाहनांची संख्या वाढून पार्किंग वाढविण्यावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे आतापासून येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासह प्रदूषण नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा सल्लाही सेठ यांनी दिला आहे.