नाशिकमध्ये शुद्ध पाण्याचा अशुद्ध धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:12+5:302020-12-25T04:13:12+5:30
नाशिक : शहरात दिवसेंदिवस बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असल्याने आता त्यासंदर्भात गैरप्रकार सुरू झाले असून, कूपनलिका आणि महापालिकेच्या नळजोडणीच्या ...
नाशिक : शहरात दिवसेंदिवस बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असल्याने आता त्यासंदर्भात गैरप्रकार सुरू झाले असून, कूपनलिका आणि महापालिकेच्या नळजोडणीच्या माध्यमातून अशाप्रकारचे अनेक बाटलीबंद पाण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे शासनाकडे म्हणजेच जिल्हा उद्योग केंद्राकडे अवघ्या २६ कारखान्यांची नोंद आहे. मात्र, शहरात दोनशेहून अधिक बोगस उद्योग सुरू असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेच्या नळजोडणीला येणारे पाणी म्हणजे अशुद्ध आणि दुकानात बाटलीबंद पाणी मिळाल्यास तेच शुद्ध अशी संकल्पना रूजल्याने दिवसेंदिवस पाण्याचा धंदा तेजीत आला आहे. शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये आता पाण्याचे जार अपरिहार्यच ठरले आहेत. त्यात लग्न सोहळ्यांना सुरुवात झाल्याने तर असे जार आणि थंड पाण्याची मागणी वाढत आली आहे. जिल्हा उद्याेग केंद्रांकडे अधिकृतरीत्या फक्त २६ प्लांटची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजेच किमान दाेनशे ते अडीचशे तरी प्लांट जिल्ह्यात असल्याचे वृत्त आहे. अगदी घरात, फ्लॅट आणि रो-हाऊसमध्ये अशाप्रकारे व्यवसाय आहेत; परंतु त्याचबरोबर पंचवटीत अनेक लॉन्स परिसरातदेखील काहींनी उद्योग थाटले आहेत. त्याची कोणतीही नोंद नाही की तपासणी होत नाही.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे त्याची नोंदणी करणेदेखील आवश्यक असले तरी आता सेंट्रलाइज्ड आणि ऑनलाइ पद्धतीच्या नोंदणीमुळे त्यांच्याकडेही अधिकृत आकडेवारी नाही. नाशिक महापालिकेची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यांच्याकडे शहरात पाण्याचा अशाप्रकारे व्यावसायिक वापर किती प्रमाणात होतो त्याची नोंददेखील पाणी पुरवठा विभागाकडे नाही. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर भागात अलीकडे असे प्लांट वाढले असले तरी नाशिक शहरासही अनेक भागात कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असल्याची चर्चा आहे.
इन्फो..
दीड ते तीन लाखांत नवीन प्लांट उभारा
राज्यातून तसेच गुजरातमधून पाण्याचे अशा प्रकारचे प्लांट उभारणीसाठी दीड ते तीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेऊन सहज प्लांटची उभारणी करून देणाऱ्या एजन्सीज असल्याचे सांगण्यात येते. यात राज्यातील काही एजन्सीज आहेत; परंतु त्याचबरोबर गुजरातमधील अनेक एजन्सीज आहेत.
...इन्फो..
स्वस्तात मिळते पाणी
सामान्य नागरिकांचा आता नियमित पाण्यापेक्षा बाटलीबंद पाण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे नामांकित कंपन्यांपासून लोकल ब्रँडपर्यंत सर्वांनाच व्यवसाय मिळू लागला आहे. अर्थात ब्रँडेड कंपन्यांचे वीस लिटर पाण्याचे जार जेथे ८० रुपयाला मिळतात तेथे लोकल ब्रँड अवघ्या तीस रुपयांना विकले जात आहेत. त्यातही सध्या खासगी कार्यालयांसाठी आणि लग्न सोहळ्यात लागणारे (थर्मास १८ लिटर्स)देखील तीस रुपयांना मिळतात. त्यामुळे परवडणारे दर म्हणून त्याकडे ओेढा वाढलेला असतो.