पाण्याची अशुद्धता ठरते आजारांना निमंत्रण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:13+5:302021-09-09T04:19:13+5:30
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ...
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ते नागरिकांच्या घरी पोहोचल्यास पाण्याच्या अशा अशुद्धीमुळे जणू अनेक आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. मात्र प्रत्येक कुटुंबाने जर उकळलेले पाणी पिल्यास या जलजन्य आजारांची शक्यताच संपुष्टात येऊ शकते.
पाण्यावर तुरटी फिरवून गाळ खाली बसल्यानंतरच पाणी प्यावे, मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे, त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणे, पाणी पिणे टाळणे आवश्यक असते. पाणीपुरी, भेळ तसेच अन्य पाण्याचा अंतर्भाव असलेले पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पिल्यास शरीराला आराम मिळू शकतो.
इन्फो
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाणी पोटात गेल्यास अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. त्यात जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, पोटातील कृमींची वाढ यांसारखे आजार होतात. दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्धच असण्याबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
इन्फो
आजारांची लक्षणे
गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणं दिसू लागतात. पोटात खूप दुखतं, कळा येतात. तीन ते चार दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. दूषित पाण्यामुळे काविळीसारखा आजार होतो. उलट्या, ताप, डोळे तसेच लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.
इन्फो
पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून प्यायल्यास निम्म्याहून अधिक जलजन्य आजारांची शक्यता संपुष्टात येते. विशेषत्वे त्यातील गॅस्ट्रो, टायफॉईड यासारखे जिवावर बेतणारे आजार तरी नक्कीच टाळता येऊ शकतात.
इन्फो
२० लिटर उकळलेले पाणी कुटुंबाला ठेवेल निरोगी
महानगराच्या क्षेत्रात नाशिक मनपाकडून दररोज १८० लिटर पाणीपुरवठा केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्ती दिवसाला किमान ३ ते ४ लीटर पाणी पितो, असे जरी गृहीत धरले तरी एका कुटुंबासाठी केवळ १६ ते २० लीटरपर्यंत दररोज पाणी उकळून घेण्याची गरज असते. म्हणजेच दररोज उकळलेले २० लिटर पाणी हे संपूर्ण कुटुंबाला जलजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.