चिंताजनक! ३६५ दिवसांत राज्यात तब्बल १५९ बिबटे मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:35 PM2022-03-04T16:35:50+5:302022-03-04T16:38:30+5:30
राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब ...
राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. २०२१ साली राज्यात १५९ पैकी ८४ बिबटे नैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. यावरुन बिबट्यांना योग्य पुरेशे सुरक्षित खाद्यदेखील उपलब्ध होत नसून बिबट्यांना संसर्गजन्य आजारांची लागण होऊनदेखील मृत्यू ओढवत आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांनी राज्यात २९ बिबट्यांना चिरडून टाकले तर नाशिकच्या लहवितजवळील रेल्वे रुळावर एक बिबट्या चिरडून ठार झाला. वर्षभरात रेल्वेच्या लोहमार्गावर केवळ हाच एक अपघात घडला आहे. उर्वरित कुठल्याही जिल्ह्यात रेल्वेखाली चिरडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद वनखात्याच्या दप्तरी नाही.
वर्षभरात औरंगाबादमध्ये चार बिबट्यांची शिकार झाली आहे. रस्ते अपघात, किंवा विहीर, तलाव किंवा नदीमध्ये बुडून मृत्यमुखी पडलेल्या बिबट्यांच्या संख्येपेक्षा नैसर्गिक मृत्यू ओढावलेला आकडा मोठा आहे. संपूर्ण राज्यात ८४ बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ३७ बिबटे नाशिकमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. तसेच राज्यात विविध कारणास्तव बिबटे मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक अग्रस्थानी आहे. नाशिकमध्ये ६६ तर पुण्यात ३३ बिबट्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.
बिबट्यांचा मृत्यू व कारणे अशी....
नैसर्गिक - ८४
वाहनांच्या धडकेत- २९
पाण्यात बुडून- ३४
शिकार-४
वीजेचा शॉक- २
अन्य कारणाने- ५
रेल्वेच्या धडकेत- १
शिकारीवर नियंत्रण
बिबट्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळविण्यास राज्यभरात वनखात्याला काही प्रमाणात यश आले आहे. २०२०च्या तुलनेत २०२१साली केवळ ४बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद आहे. औरंगाबाद वनवृत्तामध्ये ही शिकार करण्यात आली आहे. २०२०साली राज्यात १७ तर २०१९साली नऊ बिबट्यांचा शिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बळी घेतला होता.