... अन् राहडीमध्ये' दे धप्पा'! नाशिककरांची रंगपंचमी उत्साहात साजरी
By संजय पाठक | Published: March 30, 2024 08:43 PM2024-03-30T20:43:50+5:302024-03-30T20:44:13+5:30
दुपारी दोन वाजेच्या सुमारास मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर नैसर्गिक रंग या हौदामध्ये तयार करण्यात आला
संजय पाठक
नाशिक- राज्यातील बहुतांश ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळला जातो. मात्र, नाशिक मध्ये रंगपंचमीच्या दिवशीच रंगोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज पेशवे कालीन राहाडी मध्ये तसेच रेन डान्स च्या माध्यमातून शहरात सर्वत्र उत्साहात रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक शहरात सहा पेशवे कालीन राहाडी असून त्या आठ दिवसांपूर्वीच उघडण्यात आल्या होत्या. या रहाडी म्हणजेच हौदांचे विधिवत पूजन करण्यात आले.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर नैसर्गिक रंग या हौदामध्ये तयार करण्यात आला आणि त्यानंतर राहाडी मध्ये उड्या म्हणजे धप्पा घेऊन रंगोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, दुपारी दोन ते पाच अशी पोलिसांनी राहाडी मध्ये रंगोत्सव खेळण्याची वेळ पाच वाजेपर्यंत दिली असताना अर्धा तास वाढवून देण्यात आला त्यानुसार साडेपाच वाजेपर्यंत रंगपंचमी साजरी करण्यात आली दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी देखील रंगोत्सव साजरा करण्यात आला.
नाशिक पोलिसांच्या वतीने पोलीस आयुक्तालय आणि पत्रकार यांच्यामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली तर जनस्थान ग्रुपच्या वतीने नाशिक मधील कलावंतांचे रंगमंचमी साजरी करण्यात आली या नाशिक मधील नाटकातील तसेच विविध मालिकांमधील काम करणारे कलाकार सहभागी झाले होते.