आश्रमातील मुलींच्या लैंगिक शाेषणाची सखोल चौकशीचे- महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश
By अझहर शेख | Published: November 28, 2022 09:08 PM2022-11-28T21:08:57+5:302022-11-28T21:09:07+5:30
ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे.
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील म्हसरूळ येथील एका खासगी आदिवासी मुलींच्या आधाराश्रमात संचालकांकडून सहा मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संतापजनक प्रकाराने नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्य हादरुन गेले आहे. याप्रकरणी सात दिवसांत सखोल चौकशी करुन अहवाल महिला व बालविकास विभागाला सादर करण्याचे आदेश सोमवारी (दि.२८) महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे. म्हसरुळ पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याप्रकरणी संशयित संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे ऊर्फ सोनू सर याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सो, ॲट्राॅसिटीच्या कलमांखाली म्हसरुळ पोलीस ठाण्यात एकुण सहा गुन्हे तर सटाणा पोलीस ठाण्यातदेखील एका पिडितेच्या फिर्यादीवरुन बलात्कार, पोक्सो, ॲट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर व धक्कादायक प्रकाराने राज्य सरकारदेखील हादरले आहे. मंगल प्रभात लोढा यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत त्वरित एक समिती स्थापन करुन विभागाला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहे.