नाशिक : इंदिरानगरमध्ये एकावर चाकूने प्राणघातक हल्ला, खासगी कंपनीचा सीईओ गंभीर जखमी
By नामदेव भोर | Published: March 24, 2023 07:59 AM2023-03-24T07:59:29+5:302023-03-24T07:59:51+5:30
हल्लेखोर चारचाकी गाडी घेऊन फरार.
नाशिक :अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीतील सीईओ योगेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबई महामार्गावरील आंगण हॉटेलनजीक हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी मोगर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांचीच चारचाकी गाडी हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीसस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील एका पावडर कोटींग कंपनीत योगेश मोगरे हे सीईओ या पदावर कार्यरत असून ते मुंबई महामार्गालगतच्या सर्व्हिसरोडवरुन घरी जात होते. तेव्हा हल्लेखोरांनी समोरुन त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या पोटावर, छातीवर आठ ते नऊ वार केले असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पोलिसांना वायरलेस वरून घटनेची माहिती दिली. याच कालावधीत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत गुन्ह्यातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
आठवड्याभरात दुसरा प्राणघातक हल्ला
सातपूर औद्योगिक वसाहतीत कार्बन नाका परिसरात रविवारी (दि.१९) भर दिवसा एकावर गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आठवडाभरातच इंदिरानगर भागात आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.