मनमाडमध्ये शिंदे गटाला धक्का, महाविकास आघाडीला बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 05:08 PM2023-05-01T17:08:49+5:302023-05-01T17:09:31+5:30
महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदार व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी शिंदे गटाचे आमदार कांदे यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते.
संजय मोरे
मनमाड (नाशिक) : बहुचर्चित मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना धक्का बसला असून त्यांना मनमाड बाजार समितीचा गड गमवावा लागला आहे. पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या पॅनलने १२ जागांवर विजय मिळवित आ. कांदे गटाचा पराभव केला.आ.कांदे यांच्या पॅनलला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले तर ३ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदार व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी शिंदे गटाचे आमदार कांदे यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते. तर माघारीच्या वेळी झालेला राडा, मतदानाच्या पूर्व संध्येला शिर्डीत रंगलेल्या हाय होलटेज ड्राम्यामुळे मनमाड बाजार समितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीचा विजय होताच कार्यकर्त्यानी ढोल - ताश्यांच्या गजरात व गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार जल्लोष केला.