नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन
By अझहर शेख | Published: April 3, 2023 05:40 PM2023-04-03T17:40:06+5:302023-04-03T17:40:15+5:30
नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिक :
नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील १०५ तहसिलदार व ५८५ नायब तहसिलदारांनी बंदमध्ये सहभागी होत काम बंद ठेवणे पसंत केले. यामुळे जिल्ह्यातील महसुल प्रशासनाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.
राज्याती महसुल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ हे पद महत्वाचे आहे. या पदावरील अधिकाऱ्यांना वर्ग-२नुसार अजूनही वेतन दिले जात नाही. यासाठी १९९८सालापासून सरकारकडे राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना पाठपुरावा करत आहे. मात्र तरीही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारत संप केला. नायब तहसिलदारांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यात यावे, यासाठी शासनाला यापुर्वी बेमुदत बंद पुकारण्यात येईल, अशी नोटिस दिली गेली होती, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. तत्काली अपर मुख्य सचिवांनी घेतलेल्या तेव्हाच्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते; मात्र तोडगा निघू शकलेला नाही. के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या वेतन त्रुटी समिती समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे ४,८००रूपये इतके करण्याचे सादरीकरण करण्यात आले होते, असे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनोहर पोटे, बाळासाहेब वाकचौरे, सुरेश बगळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कार्यालयाच्या आवारात निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तहसिलदार व नायब तहसिलदारांनी एकत्र येत ग्रे-पे वाढीची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी या मागणीचे फलकदेखील झळकाविण्यात आले. या निदर्शनात महिला व पुरूष अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.