३०० सरपंच गिरविणार शाश्वत विकासाचे धडे
By Suyog.joshi | Published: March 2, 2024 08:02 PM2024-03-02T20:02:05+5:302024-03-02T20:02:38+5:30
कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.
सुयोग जोशी, नाशिक: स्थानिक स्तरावर शाश्वत विकास कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, यासह स्थानिक नेतृत्व विकसित करतांना त्यांच्या माध्यमातून बदल घडविण्याचा ध्यास तसेच कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पनांची माहिती जिल्ह्यातील सुमारे ३०० सरपंच गिरविणार आहे. निमित्त आहे, द मिशन क्वालिटी सिटी, सरपंच संवाद आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( ५) सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण व गुणवत्ता विकास सत्रांचे आयोजित केले आहे अशी माहिती क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारणी सदस्य जितेंद्र ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हाॅटेल गेट वे येथे मंगळवारी (दि.५) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात ही सरपंच संवाद होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठक्कर म्हणाले की, संस्थेतर्फे भारतातील पंचायत राज व्यवस्थेला पाठबळ देते व सक्षम करण्यावर भर दिला जातो आहे. या सत्रांच्या माध्यमातून सरपंचांना त्यांच्यासाठी उपयुक्त ज्ञान प्रदान करतांना ख-या अर्थाने सरपंच संवाद घडविला जाणार आहे. मिशन क्वालिटी सिटी नाशिकच्या सहकार्याने राबवत असलेल्या या उपक्रमातून नाशिक ग्रामीणमधील लोकांच्या जीवनावर परिणामकारक बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस हेमंत राठी, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील उपस्थित होते.
शिक्षण अन स्वच्छेतवर भर-मित्तल
कार्यशाळेतून कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विविध सत्रांच्या माध्यमातून सहभागी सरपंचांना ज्ञान व कौशल्ये प्राप्त होतील. ज्यांचा उपयोग करुन खेड्याचा शाश्वत विकास सध्याच्या दृष्टीने ते धेय्य निश्चिती व पुढील कार्यपध्दती ठरवू शकतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. या उपक्रमात चळवळीसोबत ४८ संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. या संयुक्त उपक्रमातून विकसीत भारत मोहिमेसाठी स्थानिक स्तरावर सक्षमीकरण व नेतृत्व विकासावर भर दिला जात असल्याचे क्युसीआयचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.