नाशिकमध्ये एम.डी ड्रग्जच्या कारखान्यापाठोपाठ कच्च्या मालाचे गुदामही उद्धवस्त
By अझहर शेख | Published: October 8, 2023 10:31 AM2023-10-08T10:31:45+5:302023-10-08T10:31:58+5:30
शिंदे गावातील एका पत्र्याच्या मोठ्या गुदामामध्ये ड्रग्जच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता.
नाशिक : साकीनाका पोलिसांनी शिंदे गावातील एम.डी ड्रग्ज बनविणारा कारखाना उद्धवस्त केल्याच्या घटनेपाठोपाठ आता नाशिक पोलिसांनी शनिवारी (दि.७) रात्री छापा टाकला. शिंदे गावातील एका पत्र्याच्या मोठ्या गुदामामध्ये ड्रग्जच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हा मोठा साठा हस्तगत केला आहे. सुमारे ३००कोटींच्या घरात या कच्च्या मालाची किंमत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदेगाव नायगावरोड एमआयडीसी भागातील एम.डी अंमली पदार्थाचा कारखाना शोधून तो उध्वस्त केला होता. शुक्रवारी हे पथक कारवाई करून परतत नाही, तोच शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांनी शिंदेगाव कॅनॉललगत असलेल्या भाडेतत्वावरील पत्र्याचे एक संशयास्पद गुदाम शोधून काढले. मिळालेल्या गोपनीयी खात्रीलायक माहितीवरून या गुदामातूनच कच्चा मालाचा पुरवठा त्या कारखान्यासाठी केला जात होता. यामुळे पोलिसांनी कटरच्या सहाय्याने पत्रे कापून आतमध्ये प्रवेश केला असता प्लॅस्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये रासायनिक द्रवरूपपदार्थाचा साठा आढळून आला. या साठ्याचा वापर एम.डी सारखे घातक अमली पदार्थ बनविण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, गणेश शेळके, सुवर्णा हांडोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी शिंदेगाव कॅनलरोडलगत असलेल्या दत्तू जाधव यांनी बांधलेल्या गाळ्याकडे आपला मोर्चा वळविला. पहिलाच जो गाळा भाड्याने दिला आहे त्याचे शटर उघडत नसल्याने पोलिसांनी बाजूच्या गाळ्याचे शटर उघडून दोन्हीही गाळ्यामध्ये असलेल्या पत्र्याच्या पार्टिशनचा एक पत्र खोलून एक नंबरच्या गाळ्यात प्रवेश केला. त्या गाड्यांमध्ये एमडी व बनविण्याचा कच्चामालाचा साठा आढळून आला हे. मध्यरात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.
सकाळी जनजागृती; संध्याकाळी ‘इफेक्ट’
शनिवारी पोलिसांनी शिंदे भागामध्ये पेट्रोलिंग करत जनजागृती केली होती. यावेळी नागरिकांनी कुठे गोडाऊन अथवा भाड्याने घेतलेली जागा असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर शिंदे गावातील रहिवाशी दत्तू जाधव यांनी कॅनॉलरोडलगत भाड्याने दिलेल्या एका गाळ्यामध्ये कारखान्यातील छाप्यात छाप्यात जशा वस्तू व ड्रम आढळून आले तसे गाळ्यात साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना कळविली.
हे साहित्य केले जप्त
अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सात ते आठ प्लॅस्टिक व लोखंडाचे मोठे ड्रम व त्यामध्ये रासायनिक द्रवरूप पदार्थ ज्याचा वास अत्यंत उग्र स्वरूपाचा होता. काचेचे ब्लोअर आदी कोट्यवधी रुपयाचा माल व साठा जप्त केला आहे. कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठविण्यासाठी या गाळ्याचा वापर गुदाम म्हणून केला जात होता, असे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले.