हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला
By अझहर शेख | Updated: March 13, 2024 14:54 IST2024-03-13T14:54:15+5:302024-03-13T14:54:54+5:30
सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला
नरेंद्र दंडगव्हाळ
नाशिक : ‘आई-वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत आहे...’ अशी चिठ्ठी लिहून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दहावीची परिक्षा सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे घरातील वातावरणाचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा विपरित परिणाम या घटनेतून समोर आला आहे.
सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी (दि.१२) भाग्यश्री हिने अचानकपणे टोकाचा निर्णय घेत सुसाइड नोट लिहून जीवनप्रवास संपविला. तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन भाग्यश्री घरी आली. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास तीने राहत्या घरातील स्वयंपाक घरात असलेल्या सिलिंग फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतला. तिची बहीण काही वेळेनंतर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आई, वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला असता पोलिसांनी भाग्यश्री हिच्याकडे चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये आई, वडीलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकुर लिहिलेला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
कौटुंबिक कलह अन् ताणतणावातून अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे पाऊल उचलावे हे तर प्रचंड धक्कादायक आहे. समाजासाठी ही धोक्याची घंटा असून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नैराश्याची पातळी उच्चस्तरावर गेली की, आत्महत्येचा विचार मनात येतो. वैचारिक शक्ती तेथे खुंटते. समस्येला आता कुठलाही उपाय शिल्लक राहिलेला नाही, असा नकारात्मक विचार मनात येतो अन् त्यातून असे प्रकार घडतात. आपल्या वर्तणूकीचा मुलांवर प्रभाव पडत असतो, हे पालकांनी विसरू नये. - डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ञ तथा पोलिस आयुक्तालय समुपदेशन समिती, मुख्य समन्वयक