दहा तासांच्या परिश्रमानंतर जलवाहिनी दुरुस्त; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश
By Suyog.joshi | Published: June 18, 2024 05:03 PM2024-06-18T17:03:31+5:302024-06-18T17:04:29+5:30
मंगळवारी (दि.१८) कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असून सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु होईल.
नाशिक (सुयोग जोशी) : नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी गंगापूर धरणातील थेट जलवाहिनी दहा तासांच्या परिश्रमानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सोमवारी रात्री उशिराने दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे धुव्रनगर, रामराज्य, नहुष,बळवंत नगर, गणेशनगर येथील जलकुंभावाद्वारे सातपूर व नाशिक पश्चिमला होणारा पाणी पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी (दि.१८) कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असून सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु होईल. शहराचा नव्वद टक्के पाणी पुरवठा हा गंगापूर धरणातून होतो.
गंगापूर धरणातून पाईपलाईनद्वारे शिवाजीनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी नेले जाते. तेथे शुध्दीकरण प्रक्रिया करुन ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र सोमवारी सकाळी मोतीवाला काॅलेज येथे जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहरातील काही भागांचा होणारा पाणी पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून तत्काळ दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आले. या जलवाहिनीद्वारे पंचवटी, नाशिक पश्चिम,सातपूर या भागांमध्ये पाणी पुरवठा होतो. शहरातील १२० पैकी पाच जलकुंभाद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद होता. त्यामध्ये प्रामुख्याने सातपूर व नाशिक पश्चिम विभागातील नागरिकांना पाणीबाणीला तोंड द्यावे लागले. दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या पथकाकडून रात्री उशीरापर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु होते. दहा तासांच्या प्रयत्नानंतर गळती बंद करण्यात यश आले.
महानगरपालिकेने तातडीने पंपिंग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशीरा गळती बंद करण्यात यश आले. मंगळवार सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. - रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा