नाशिक, दिंडोरीत ५१ उमेदवार रिंगणात आता लक्ष माघारीकडे
By संकेत शुक्ला | Published: May 4, 2024 05:19 PM2024-05-04T17:19:58+5:302024-05-04T17:20:57+5:30
दोन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असून सोमवारी (दि. ६) होणाऱ्या माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी (दि.४) झालेल्या छाननीत दोन्ही मतदारसंघातून ११ अर्ज बाद झाले असून आता नाशिकमध्ये १५ तर दिंडोरीसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असून सोमवारी (दि. ६) होणाऱ्या माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. उमेदवारीसाठी दाखल अर्जांची शनिवारी (दि.४) छाननी प्रक्रिया पार पडली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात नाशिकची सुनावणी घेण्यात आली. त्यात हेमंत गोडसे यांच्या शपथपत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखवली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र तो फेटाळण्यात आला. याशिवाय भाजपकडून अर्ज दाखल केलेल्या अनिल जाधव यांनी तसेच शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना (शिंदेगट) एबी फॉर्म दाखल न केल्याने त्यांचे प्रत्येकी एक अर्ज फेटाळण्यात आले. याशिवाय भक्ती गोडसे, जयदेव मोरे व भीमराव पांडवे यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. यानंतरही उद्धव सेना बंडखोर विजय करंजकर आणि निवृत्ती आरिंगळे या बंडखोरांचे आव्हान कायम आहे. या छाननीनंतर नाशिकच्या मैदानात आता ३६ उमेदवार शिल्लक आहेत.
दिंडोरी मतदारसंघाची छाननी प्रक्रिया अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पाच अर्ज बाद करण्यात आले. त्यामध्ये सुभाष चाैधरी, पल्लवी भगरे, काशीनाथ वटाणे (एमआयएम) खान गाजी इकबाल अहमद व संजय चव्हाण (बंडखोर) यांचे नामनिर्देशन पत्र बाद ठरविण्यात आले. यानंतर मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी (दि. ६) दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर १८ व्या लोकसभेसाठी जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.