जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य
By संकेत शुक्ला | Published: May 18, 2024 05:16 PM2024-05-18T17:16:22+5:302024-05-18T17:21:01+5:30
शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
संकेत शुक्ल,नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आल्याचा आरोप करीत शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नाशिक येथे आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, पराभव समोर दिसू लागल्यामुळेच उद्धव यांनी आरएसएस प्रकरणावर टीका करायला सुरुवात केली आहे. जनाधार नसल्यानेच ते वायफळ आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. मोदी यांच्यावर टीका करताना ठाकरे मर्यादा सोडत असून, मोदी यांनी काय काय कामे केली आहेत ते सगळ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे कोणी काहीही आरोप केले तरी जनतेला सगळे ठाऊक आहे.
अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होत असून त्यांच्या तोंडी हे वाक्य पेरले गेले आहे. त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ काढता येणार नाही, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपने आपल्याला पाठिंबा दिल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितल्याच्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, आम्ही महायुतीत असल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हीच पाठिंब्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आमचे ऐकले असते तर मतविभाजन टळले असते. परंतु, त्यांनी एकले नाही. याव्यतिरिक्त महाराजांशी काहीही बोलणे झाल्याचा महाजन यांनी इन्कार केला.