नाशिकमध्ये भूमिअभिलेखचा लिपिक ४० हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात
By नामदेव भोर | Published: February 27, 2023 05:37 PM2023-02-27T17:37:17+5:302023-02-27T17:37:56+5:30
नाशिक - वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकाची मोजणी करून त्यातील पोट हिश्शाच्या खुणा दाखविण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे ...
नाशिक - वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकाची मोजणी करून त्यातील पोट हिश्शाच्या खुणा दाखविण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार रुपयांप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व नकाशावर शासकीय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे ५० हजार रुपयांप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिक नीलेश शंकर कापसे (३७, रा. नवोदय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, उदयनगर, मखमलाबाद रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. २७) रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. २७) सापळा लावून भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी अलिपीक नीलेश शंकर कापसे याला अटक केली. संशयितांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिश्शाच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व नकाशावर शासकीय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे ५० हजार रुपयांप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु, तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्यास सांगितल्या. त्यामुळे संशयितांनी प्रत्येक गटाचे दहा हजार रुपये याप्रमाणे चार गटांचे ४० हजार रुपये लाचेची मागणी करून पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलिस हवालदार, एकनाथ बाविस्कर व पोलिस शिपाई नितीन नेटारे यांनी त्यांना सापळा लावून अटक केली.
भूमिअभिलेख बनले भ्रष्टाचाराचे कुरण
भूमिअभिलेख कार्यालयात पैशांशिवाय कोणतेही काम होत नसल्याची सामान्य नागरिकांची तक्रार असून, ३१ जानेवारी २०२३ रोजी थेट भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार महादेव शिंदे (५०) यांंच्यासह कनिष्ठ लिपिक अमोल भीमराव महाजन (४४) यांना १ लाख रुपयांची लाचेची मागणी करून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली होती. त्यानंतर महिन्याभराचाही कालावधी उलटत नाही तोच सोमवारी (दि. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भूमिअभिलेख कार्यालयातील आणखी एका लिपिकाला अटक केल्याने भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याची चर्चा होत आहे.