आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया
By संकेत शुक्ला | Published: June 19, 2024 04:41 PM2024-06-19T16:41:41+5:302024-06-19T16:42:36+5:30
सोडतीअभावी पालकांचा जीव मात्र टांगणीला.
संकेत शुक्ल,नाशिक : वेगवेगळ्या मुद्यांमध्ये अडकलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला लागलेले ग्रहण अद्यापही सुटले नसून आता न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये ही प्रक्रिया अडकली आहे. ४ आणि ११ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत आरटीईचे प्रवेश शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बदललेल्या नियमामुळे आरटीईचे प्रवेश अटींमध्ये अडकून पडले होते. त्या एक किलोमीटर अंतरातील खासगी संस्थांच्या प्रवेश निर्बंधांना विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला खरा, मात्र त्यानंतर पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यातच शालेय संस्था आणि पालक संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने नवाच वाद निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रवेश अडकून पडले आहेत.
आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यातील ५ हजार जागांसाठी सुमारे १५ हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी काढली आहे. मात्र, याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जात आहे. न्यायालयात १२ जून रोजी सुनावणी होणार होती. पण, काही कारणास्तव ती झाली नाही. तसेच १३ जून रोजी सुद्धा काही कारणांमुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता १८ जून रोजी झालेल्या सुनावणीत काही शाळा आणि संघटनांनी नव्याने याचिका दाखल केल्या. त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळा दिला असून, पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात केलेला बदल हा बरोबर आहे. त्यामुळे त्याला देण्यात आलेली स्थगिती उठवावी, अशी एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तर, काही शाळांनी कायद्यात बदल केल्यानुसार आरटीईच्या आरक्षित जागांवर प्रवेश दिले आहेत. या जागांना संरक्षण द्यावे, अशीही याचिका दाखल झाली आहे. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी लागणार आहे.
आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आणखी काही संघटनांनी व शाळांनी आरटीईप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आरटीई संदर्भातील पुढील सुनावणी आता एक सुनावणी ४ जुलै तर दुसरी ११ जुलैला घेतली जाणार आहे. परिणामी, पालकांना आरटीई प्रवेशाची जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.