नाशिकमध्ये म्युनीसीपल कर्मचारी कामगार सेनेवरून ठाकरे- शिंदे गटात घमासान
By संजय पाठक | Published: September 27, 2022 04:39 PM2022-09-27T16:39:45+5:302022-09-27T16:42:16+5:30
गेल्य आठवड्यात तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या बरोबर त्यांना शिंदे गटाचे महानगर प्रमुखपद देण्यात आले आहे.
नाशिक - राज्यातील सत्ता संघर्षावर खंडपीठात सुनावणी सुरू असतानाच नाशिकमध्येही महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेवरून संघर्ष सुरू झाला आहे. म्युनिसीपल सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून, अध्यक्षपदावरील दावा कायम ठेवला आहे. यातच, सेनेच्या अध्यक्षपदी सुधाकर बडगुजर यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज सायंकाळी बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, ही बैठक महापालिकेत घेण्यास आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने. आता ती शालिमार येथील शिवसेना कार्यालयात होणार आहे. येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्य आठवड्यात तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या बरोबर त्यांना शिंदे गटाचे महानगर प्रमुखपद देण्यात आले आहे. तर त्यांची हकालपट्टी करीत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी म्युनिसीपल सेनेच्या अध्यक्षपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बडगुजर यांनी आज महापालिकेत पदग्रहण करण्यासाठी बैठक बोलावली असतानाच आयुक्तांनी महापलिकेत या बैठकीला परवानगी नाकारली आहे. तर कामगार उपआयुक्तांनी बैठक बोलवण्याचा अधिकार प्रविण तिदमे यांना असल्याचे पत्र काही वेळापूर्वीच दिले आहे. यामुळेच आता ही बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात होणार आहे.