नाशिकमध्ये ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत गावगुंडांकडून जबर मारहाण
By अझहर शेख | Published: March 4, 2024 03:42 PM2024-03-04T15:42:44+5:302024-03-04T15:42:55+5:30
याप्रकरणी काही दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
संदीप झिरवाळ
पंचवटी : म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर असलेल्या चाणक्यपुरी सोसायटीत गावगुंडांनी धुमाकूळ घालत कारची तोडफोड करत दंगल घडविल्याची घटना घडली. एका ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत त्याला बेदम मारहाण करत शनिवारी (दि.२) रात्री धिंगाणा घातल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामसेवक विजय तुकाराम पवार (४०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीतील चाणक्यपुरी सोसायटीत दिंडोरी तालुक्यात बाडगीचा पाडा येथील ग्रामसेवक असलेले पवार हे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री याच परिसरात राहणाऱ्या काही गावगुंडांच्या टोळक्याने एका वाहनाची काच फोडली त्यावरून पवार समजूत काढण्यासाठी गेले असता, त्यांनी त्याचा राग धरून त्यांना दगडाने बेदम मारहाण केली. यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरडाओरड करत त्यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पवार यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी सुमित शाह, अर्जुन कतोरे व त्याचे इतर तीन ते चार साथीदार यांच्यावर दंगल घडवून आणणे, तसेच बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न
चाणक्यपुरी सोसायटीच्या परिसरात राहणाऱ्या संशयित आरोपींची तसेच इतर काही जण परिसरात दहशत असून याच टोळीतील अनेक जण रात्री इमारतीच्या परिसरात खुलेआम मद्यपान करत रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या संशयितांमुळे सोसायटीतील इतर रहिवासी सदस्य गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाणक्यपुरी सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.