पाच लाखाच्या खंडणीसाठी दुकानदाराला बॉम्बने उडविण्याची धमकी; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2023 04:43 PM2023-07-04T16:43:49+5:302023-07-04T16:43:54+5:30
पथकाकडून बॉम्ब निकामी, गुळवंच येथील प्रकार, भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला.
शैलेश कर्पे
सिन्नर (जि. नाशिक) - तालुक्यातील गुळवंच येथील किराणा दुकानदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत पैसे न दिल्यास कुटुंबियास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत बंदुकीच्या सहाय्याने दुकानदार व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी (दि.३) तालुक्यातील गुळवंच येथे चंद्रकांत विठ्ठल आंबेकर (५६) यांचे श्रीराम किराणा दुकान आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास गावातीलच विष्णू एकनाथ भाबड व बबन मल्हारी भाबड हे दोघे आंबेकर यांच्या दुकानात गेले. संशयित विष्णू भाबड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आंबेकर यांच्याकडे खताच्या गोण्या उधार मागितल्या होत्या, तेव्हा भाबड याने आंबेकर यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
आंबेकर हे किराणा दुकानाच्या पायरीवर बसलेले असतांना संशयित भाबड यांनी आंबेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानात जावून चंद्रकांत आंबेकर बंदुकीने डोळ्यावर व त्यांच्या पत्नी यांना डोक्यावर मारहाण केली. सोबत असलेल्या स्टीलच्या डब्यातील बॉम्ब सदृश्य वस्तूचा दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली. पाच लाख रुपये न दिल्यास आंबेकर यांना व कुटुंबियांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर डब्यात गावठी पेट्रोल बॉम्ब व सुतळी बॉम्ब असल्याचे समजते.
भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने धमकी देणारा संशयित पळाला. पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू लोंढे, हवालदार भगवान शिंदे, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. त्यानंतर तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत पोलीस पथक मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते.
पहाटे सहा वाजता मालेगाव येथील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिस मुख्य संशयित विष्णू एकनाथ भाबड याचा शोध घेत होते. भाबड याने रात्रीचा प्रकार घडल्यानंतर घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. भाबड याने स्वत: बॉम्ब बनवला की दुसऱ्या कडून बनवून घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, अन्य एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
पोलीस अधीक्षक उमाप यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी गुळवंच येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासकामी एमआयडीसी पोलिसांना सूचना केल्या.