अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
By Suyog.joshi | Published: January 17, 2024 03:02 PM2024-01-17T15:02:51+5:302024-01-17T15:04:33+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या आदेशास अनुसरून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मान्यतेने ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
नाशिक : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. मनपाच्या कार्यक्षेत्रात विभागनिहाय विविध प्रभागांत सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रस्ते दुभाजक, नदीपात्र, नदीकिनारे, बाजारपेठा, व्यावसायिक ठिकाणे, सुलभ शौचालये, मनपा उद्याने, मोकळी भुखंडे, धार्मिक स्थळ परिसर, गोदाघाट, पूल इ.सर्व ठिकाणी वरील मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार दि.१६ जानेवारी रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १३ येथील जिल्हा परिषद ऑफिससमोरील परिसर व प्रभागात क्रमांक १४ येथील अमरधाम येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेस नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभागास नेमून दिलेले संनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नाशिक पश्चिम व पूर्व, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग व इतर सर्व विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या आदेशास अनुसरून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मान्यतेने ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.