जिपच्या नवीन इमारतीत काही विभाग होणार ‘शिफ्ट’ !
By धनंजय रिसोडकर | Published: May 21, 2024 05:34 PM2024-05-21T17:34:33+5:302024-05-21T17:35:18+5:30
बांधकाम झालेल्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून फर्निचर करण्यासाठी निधीची तरतूद नसतानाही काही विभाग हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे तीन मजल्यांचे बांधकाम झाले असून उर्वरित तीन मजल्यांच्या कामाला मागील मार्चमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बांधकाम झालेल्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून फर्निचर करण्यासाठी निधीची तरतूद नसतानाही काही विभाग हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच फर्निचर नसल्यामुळे नवीन ठिकाणी या कार्यालयांचे स्थलांतर कसे शक्य होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकरच जिल्हा परिषदेचे कार्यालये नवीन इमारतीत हलवण्याबाबत सुतोवाच केले आहे. मात्र, सध्या बांधकाम झालेल्या तीन मजल्यांवर सर्व कार्यालयांना जागा मिळू शकणार नाही. नाशिक जिल्हा परिषदेची सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्यामुळे २०१९ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या २५ कोटी खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. इमारतीच्या खर्चामध्ये वाढ होऊन तो ३९.६१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
सातपूर मार्गावर पशुसंवर्धन विभागाच्या जागेत या इमारतीच्या प्रस्तावित सहा मजल्यांपैकी सध्या दोन तळ मजले तीन मजले यांचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या रंगकाम सुरू आहे. दरम्यान या इमारतीच्या उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामासाठीही ग्रामविकास विभागाने ४१.६७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. दरम्यान काम पूर्ण झालेल्या तीन मजल्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालये हलवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन सुरू केले असले तरी तिथे अद्याप फर्निचरच नसून त्यासाठीची आर्थिक तरतूदही झालेली नाही. या तीन मजल्यांवर शक्य तितक्या विभागांची कार्यालये सुरू करायची व साधारण दीड-दोन वर्षात उर्वरित तीन मजल्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कार्यालये तेथे स्थलांतरीत करण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे.